वसंत बहार : सेंद्रिय शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दोन बहिणींनी लिहिलं पुस्तक, लहान वयात मातीचा अभ्यास!
तुम्हीच तुमच्या आरोग्याचे शिल्पकार आहात, हे या पुस्तकाच्या माध्यमातून दीपाली व अंजलीनं सांगितलं आहे.

Published : December 25, 2025 at 4:52 PM IST
नागपूर : सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. या टेक्नॉलॉजीच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी झाली असून मोबाईल, गेम, लॅपटॉप आणि सोशल मीडिया यावर त्यांचा जास्त फोकस असल्याचं दिसून येतं. मात्र, नागपुरातील दोन बहिणी याला अपवाद ठरल्या आहेत. बदलत्या जीवन शैलीमुळं टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. परंतु माणसानं मानवतेच्या दृष्टीनं जगणं देखील तितकेच महत्वाचं आहे. त्यामुळं अभ्यास आटोपल्यावर दीपाली राठोड आणि अंजली राठोड या दोन बहिणींनी वेळ घालवण्यासाठी शेतीचा पर्याय निवडला आहे. यातूनच सेंद्रिय शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी "वसंत बहार - कार्व्हिंग द लाइफ विथ हेल्थ" हे पुस्तक लिहिलं आहे.

पुस्तक लिहिण्याचा उद्देश काय? : नागपूर शहरात म्हणजेच सिमेंटच्या जंगलात शेती कुठं बघायला मिळेल म्हणून राठोड कुटुंबीयांनी चक्क अपार्टमेंटच्या गच्चीवर शेतीची संकल्पना साकार केली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची शेती केली आहे. फळबाग सुद्धा फुलवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाच्या गरजेएवढा रासायनिक मुक्त भाजीपाला देखील गच्चीवरच पिकविला जातो. या टेसेस शेतीत काम करतानाच दीपाली आणि अंजली राठोड या दोन बहिणींना मातीची ओळख झाली. त्यातून मातीचे विविध प्रकार व मातीचे आरोग्य, यावर त्यांचा अभ्यास होत गेला. त्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाचा उपयोग हा शेतकऱ्यांना आणि कमी जागेत घरीच शेती पिकवण्याचा प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना व्हावा, या उद्देशानं "वसंत बहार- कार्व्हिंग द लाइफ विथ हेल्थ" हे पुस्तक लिहिलं. तसंच, तुम्हीच तुमच्या आरोग्याचे शिल्पकार आहात, हे या पुस्तकाच्या माध्यमातून दीपाली व अंजलीनं सांगितलं आहे.
हेल्दी लाइफस्टाईलविषयीचे सर्व अनुभव : दीपाली आणि अंजलीच्या मते, आजची तरुण पिढी शेतीपासून एकदम दूर गेली आहे. आपण दररोज जे अन्न खात आहोत, ते नेमकं कुठून येत आहे. याची कुणालाही अजिबात कल्पना नाही. पौष्टिक अन्न मिळत नसल्यामुळंच कुपोषणासह इतर आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत. जेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलांना गच्चीवर भाजीपाला उगवताना आणि मशागत करताना पाहिले. तेव्हा : दीपाली आणि अंजलीच्या देखील मनात याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्यासाठी ही केवळ गार्डन नाही, तर एक प्रयोगशाळा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जमिनीविनाही छतावर उत्तम शेती करता येऊ शकते, असं आम्हाला आई-वडिलांकडून शिकायला मिळाल्याचं त्या सांगतात. "ज्यावेळी आम्ही बारकाईनं संशोधन केल्यानंतर 'केमिकल फार्मिंग'पासून दूर राहून 'ऑर्गेनिक फार्मिंग'ला प्रोत्साहन दिल्यास जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो, हे आम्हाला कळाले. म्हणूनच आई-वडिलांच्या प्रेरणेतून 'टेरेस गार्डनिंग', ऑर्गेनिक फार्मिंग व हेल्दी लाइफस्टाईलविषयीचे सर्व अनुभव आम्ही ‘वसंत बहार- कार्व्हिंग द लाइफ विथ हेल्थ' या पुस्तकात लिहिले", असं त्या दोघींनी सांगितलं.

आरोग्य, शेती आणि माती : आरोग्य, शेती आणि माती काल कशी होती व आज कशी आहे, यासंदर्भात दीपाली व अंजली यांनी आपल्या पुस्तकात सविस्तरपणे लिखाण केलं आहे. याचबरोबर, मातीवर सतत होणाऱ्या रासायनिक फवारणीमुळेच मातीतील पोषकतत्वं तर नष्ट होत आहेत. शिवाय मातीची गुणवत्ता देखील संपत असल्याचं निरीक्षण या दोघी बहिणींनी नोंदवलं असून त्यावरील उपाय देखील त्यांनी सुचवलं आहेत. तसंच शेतात उपयोगात आणले जाणारे केमिकल अन्न आणि फळांमध्ये उतरले आहे. यापासून बचाव करण्यासाठी काय कारावं, हे देखील या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.

... अशी सुरू झाली सेंद्रिय शेती : आजकाल जिकडे तिकडे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा प्रभाव असलेल्या भाजीपाला व फळ्यांचा बोलबाला आहे. त्यांच्या सेवनामुळं गंभीर आजार होऊन आरोग्यावर फार विपरित परिणाम होत आहेत. त्यामुळं यातून मार्ग काढण्यासाठी दीपाली व अंजलीच्या आई-वडिलांनी ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात. त्या अपार्टमेंटच्या चौथ्या माळावर ऑर्गेनिक फार्मिंग अर्थात सेंद्रिय शेती सुरू केली आहे. त्यांनी सुटकेस, कुलरचा पॉट, बादली, तेलाचे डबे, कुंड्या या टाकाऊ वस्तूंचा वापर करून विविध प्रकारच्या हिरवा भाजीपाला, फुला-फळांचं पीक घेण्यास सुरुवात केली. आई-वडील शहराच्या 10 ते 20 किलोमीटर अंतरावरून वेगवेगळ्या प्रकारची माती आणायचे. त्या मातीचा अभ्यास अंजली आणि दीपाली यांनी केला. शहरातील माती व ग्रामीण भागातील माती यातील फरक त्यांनी ओळखला. त्यातून सुरू झालेला हा प्रवास त्या दोघींनी आपल्या पुस्तकात मांडला आहे.

सेंद्रिय शेतीमुळं बदललं जीवन : सेंद्रिय शेतीमुळं आर्थिक बचत तर होईलच याशिवाय परिवाराला बाराही महिने ताजा आणि विषमुक्त भाजीपाला मिळून आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होणार आहे. राठोड कुटुंबाची अनोखी परसबाग केवळ नैसर्गिक शेती नसून, आरोग्य, पर्यावरण व समाजाला जोडणारे एक माध्यम बनलं आहे.

हेही वाचा :
- तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं; संजय राऊतांचा शिंदे सेना आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल
- 'मी 21 व्या वर्षी कलेक्टर होणारच' विद्यार्थ्यांच्या घरातल्या भिंती घेतात स्वप्नांचा श्वास, विद्या मंदिर चाळणवाडी शाळेची ‘लोकल टू ग्लोबल’ भरारी
- रायगडच्या कोर्लई येथील ऐतिहासिक चर्चमध्ये नाताळ सण साजरा; पाहा सुंदर आणि मनमोहक देखावे

