'वंदे मातरम्' धार्मिक गीत नव्हे, भारतीय स्वातंत्र्याच्या परवलीचा शब्द; मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींचे नाव न घेता सुनावले
अबू आझमींचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावताना फडणवीसांनी मौलाना आझाद यांचा दाखला देत हा वाद चुकीचा असल्याचे नमूद केले.


Published : November 7, 2025 at 1:07 PM IST
|Updated : November 7, 2025 at 2:03 PM IST
मुंबई : ‘वंदे मातरम्’ हे कोणत्याही धर्माचे गीत नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या परवलीचा शब्द आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्य आहे. अलिकडे काही लोक हे धार्मिक गीत असल्याचा वाद निर्माण करतात, पण स्वातंत्र्यसैनिकांची जात-पंथ-भाषा विसरून एकत्र येताना याच गीताने एकजूट केली होती, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अबू आझमींचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावताना फडणवीसांनी मौलाना आझाद यांचा दाखला देत हा वाद चुकीचा असल्याचे नमूद केले.
पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याकडून ‘वंदे मातरम्’चे सुमधुर सादरीकरण : थोर कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित समूहगान कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी ‘वंदे मातरम्’चे सुमधुर सादरीकरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीडशे वर्षानंतरही भारताला दिशा देण्याचे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘‘वंदे मातरम् या प्रेरणागीताने ब्रिटिश राजवटीत भारतीयांना जात-धर्म-पंथ विसरून एकत्र आणले. वंगभंग चळवळीला दिशा देण्यापासून ते स्वातंत्र्याच्या पहिल्या झेंड्यावर लिहिले जाण्यापर्यंत या गीताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधी आपल्या प्रत्येक पत्राचा समारोप ‘वंदे मातरम्’ने करू लागले होते. आज 150 वर्षांनंतरही हे गीत भारताला दिशा देत आहे.’’ ‘‘अलिकडे काही लोक ‘आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, हे धार्मिक गीत आहे’ असा दावा करतात. त्यांना माहिती नाही की स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येकाने वंदे मातरम् म्हटले तेव्हा कोणाला हे कोणत्या धर्माचे गीत वाटले नव्हते. मौलाना आझाद यांनी स्पष्ट लिहून ठेवले आहे की, ‘वंदे मातरम्’ला धार्मिक गीत म्हणणे ही सर्वात मोठी चूक ठरेल,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करणार : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, ‘वंदे मातरम्’ सार्थ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पुढील वर्षभर कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेपासून जोडले जाईल, असे ते म्हणाले.
हेही वाचाः
आचारसंहितेतून सूट हवी? मग समितीकडे प्रस्ताव पाठवा; निवडणूक आयोग ठेवणार करडी नजर!

