दुबईत अडकलेल्या कोल्हापूरकरांचा जीव मुठीत घेऊन परतीचा प्रवास; यूएईनं दिलं 26 हजारांचं 'सॉरी गिफ्ट'
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वाधिक फटका पर्यटकांना बसतोय. दरम्यान दुबईतून मायदेशात परतलेल्या पर्यटकांना यूएईनं 'सॉरी गिफ्ट' दिलंय.

Published : March 3, 2026 at 7:51 PM IST
|Updated : March 3, 2026 at 8:58 PM IST
कोल्हापूर : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षामुळं दुबईसह आखाती देशांतील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. याचा फटका जगभरातील पर्यटकांसह कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमधील 23 पर्यटकांनाही बसला. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावचा हा प्रवासी ग्रुप युद्धजन्य परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन मायदेशी परतला आहे.
'करवीर निवासिनी आई अंबाबाईचा आशीर्वाद म्हणूनच आम्ही आमच्या घरी सुखरुप परतू शकलो. आम्ही परतलो असून दुबईसह इतर ठिकाणी अडकलेल्या सर्वांनाच भारत सरकारनं परत आणावं,' अशी भावना या कोल्हापूरकरांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे परतीच्या मार्गावर लागल्यानंतर दुबई प्रशासनानं दिलगिरी म्हणून ग्रुपमधील प्रत्येकाला 26 हजार रुपयांची भेट दिली आहे.
इराणनं बंद केली हवाई हद्द : अमेरिका-इस्रायलनं इराणच्या विविध भागांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले. तर इराणनं प्रत्युत्तर देत अमेरिकन एअरबेसवर निशाणा साधला. यानंतर इराणनं आपली हवाई हद्द बंद केल्याचं जाहीर केलं. याचा परिणाम दुबई, अबु धाबी आणि शारजाह विमानतळांवर झाला. मुंबई-पुणे ते दुबईची उड्डाणं रद्द झाल्यामुळं अनेक भारतीय पर्यटक अडकले. यात महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं 28 फेब्रुवारीला विमान कंपन्यांना इराण, इस्रायल, लेबनॉन, सौदी अरेबिया आदी देशांच्या हवाई हद्दी टाळण्याचे निर्देश दिले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही याबाबत सांगितलं होतं की, 'आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकरांची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडं आहे. ते सुरक्षित आहेत.'
हुपरी ग्रुपचा भयावह अनुभव : हुपरीतील 23 जणांचा पर्यटन ग्रुप दुबईत हॉटेलमध्ये अडकला होता. हे सर्वजण 23 तारखेला कोल्हापुरातून दुबई फिरण्यासाठी गेले होते. महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश असलेला हा ग्रुप दुबईमध्ये पर्यटनाचा आनंद होता. अचानकच रात्री बारा वाजता सर्वांच्या मोबाईलवर आहे. त्या ठिकाणी सुरक्षित राहण्याचे अलर्ट मेसेज आले. "मोबाईलवर आलेल्या अलर्ट मेसेजमुळं आम्ही सर्वजण घाबरुन गेलो होतो. यातच दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या आजुबाजूला तीन जागी स्फोट झाले. त्यामुळं आम्ही आणि अजून 23 जणांचा एक ग्रुप असे सर्वजण घाबरतच दुपारी जेवणासाठी बाहेर पडलो. तेव्हाही एका बिल्डिंग मागून स्फोटामुळं प्रचंड मोठा धुराचा लोट येताना आम्हाला नजरेस पडला. आम्ही सर्वजण प्रचंड घाबरलो होतो. आमच्या पाठीशी देव असल्यानं परत आलो, असं आम्हाला वाटत आहे." अशी प्रतिक्रिया दुबईतून परतलेले पट्टणकोडोली गावचे प्रकाश जाधव यांनी दिली.

परत आल्याचा खूप आनंद : "पहिल्यांदाच आम्ही दुबई बघायला गेलो होतो. मात्र, दुबई बघून झाल्यानंतर शेवटच्या दोन-तीन दिवसात घडलेल्या घटनांमुळं आम्ही सगळेच घाबरलो होतो. मात्र, आता आम्ही परत आल्याचा मला खूप आनंद होत आहे," असं या पर्यटन ग्रुपच्या माध्यमातून दुबईला पहिल्यांदा गेलेला आणि युद्ध परिस्थिती अनुभवलेल्या समरजीत बारगे या लहानग्यानं सांगितलं.
परिस्थिती पाहून आमच्या जीवाची घालमेल झाली : "आजूबाजूला होत असलेले हल्ले, आकाशात उठणारे धुराचे लोट आणि विमानतळाची अवस्था पाहून आमच्या जीवाची घालमेल होत होती. कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन सतत आमच्या संपर्कात होते. त्यांनी आम्हाला मदत करत दोन्ही सरकारच्या मदतीनं सुखरुपपणे परत आणलं. त्यामुळंच आमच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले आहेत. मात्र, आमच्याप्रमाणेच इतर काही देशवासीय देखील त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांनाही लवकरात लवकर परत आणावं, हीच इच्छा आता आम्हा सर्वांची आहे," अशी प्रतिक्रिया राजाराम हाटकर यांनी दिली आहे.

यूएई प्रशासनाची उदार मदत : यूएईच्या जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीनं अडकलेल्या 20 हजार प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहणं, जेवण, पाणी आणि पुन्हा बुकिंगचा सर्व खर्च उचलले आहेत. अबू धाबीमध्ये हॉटेलमध्ये राहण्यासाठी राज्याकडून भरपाईची हमीदेखील दिली होती. तर दुबईनं परतणाऱ्या या ग्रुपच्या प्रत्येक कोल्हापूरकराला 26 हजारांचे 'सॉरी गिफ्ट' देऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. सरकारनं विमान कंपन्यांशी समन्वय साधला आहे. सोमवारी रात्रीपर्यंत अनेकजण परतले. मात्र, काहीजण अजूनही परतीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या या प्रवासी ग्रुपच्या वाटेला आलेल्या या अनुभवामुळं त्यांची दुबई सहल नक्कीच आयुष्यभर लक्षात राहिल, हे मात्र नक्की.
हेही वाचा :

