ETV Bharat / state

दुबईत युद्धाचा भडका; पिंपरी-चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिक दुबईत अडकले

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका पर्यटकांना बसत आहे. पर्यटनासाठी दुबईला गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 40 ज्येष्ठ नागरिक अडकले आहेत.

PIMPRI TOURISTS STRANDED IN DUBAI
दुबईत युद्धाचा भडका (AP Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 2:42 PM IST

|

Updated : March 3, 2026 at 3:50 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पिंपरी-चिंचवड : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला केल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीचा अनेकांना फटका बसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिक पर्यटनासाठी दुबईला गेले आहेत. परंतु दुबईमध्ये अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं ते तिथं अडकले आहेत.

सांगवी परिसरातील गायकवाड कुटुंबातील सदस्य हे दुबईमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार हे सर्व नागरिक भारतात परतणार होते. मात्र अचानक उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळं विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळं त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग सध्या बंद झाला आहे.

प्रतिक्रिया देताना नातेवाईक (ETV Bharat Reporter)

युद्धजन्य परिस्थितीमुळं परतीचा मार्ग खंडित : ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप 25 फेब्रुवारीला पर्यटनासाठी दुबईला रवाना झाला होता. पर्यटन दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध स्थळांना भेट दिली. मात्र, गेल्या दोन दिवसांत दुबई आणि परिसरात तणाव निर्माण झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील सर्व उड्डाणं तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. परिणामी, परतीच्या विमानाचं आरक्षण असतानाही हा संपूर्ण ग्रुप दुबईतच अडकला आहे.

Pimpri Tourists Stranded in Dubai
दुबईमध्ये अडकलेले पर्यटक (ETV Bharat Reporter)

कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण : अडकलेले सर्व नागरिक सध्या सुरक्षित स्थळी असल्याची माहिती पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिली आहे. स्थानिक प्रशासन आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीनं त्यांची राहण्याची आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही, दुबईवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या बातम्या आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. विशेषतः सर्वजण ज्येष्ठ नागरिक असल्यानं त्यांच्या आरोग्याची काळजी कुटुंबीयांना अधिक सतावत आहे.

भारत सरकारनं हस्तक्षेप करावा : दुबईत अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी भारत सरकारकडं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. 'विशेष विमानाची सोय करून किंवा अन्य पर्यायी मार्गानं या सर्वांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणावं,' अशी विनंती ज्येष्ठ नागरिकांच्या नातेवाईकांनी केली आहे. "आमचे आई-वडील सुरक्षित आहेत. मात्र परिस्थिती अनिश्चित आहे. भारत सरकारनं लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा," अशी भावना एका नातेवाईकानं व्यक्त केली. दरम्यान, संबंधित कुटुंबीयांकडून भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. सर्वांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना केली जात आहे.

हेही वाचा :

  1. लाइव्ह US-Israel Iran War : कुवेतनं चुकून अमेरिकेची तीन F-15E लढाऊ विमानं पाडली
  2. अमेरिका अन् इराण संघर्षाचा फटका निर्यातीला, हजारो टन माल निर्यात न झाल्याने पडून
  3. इस्रायल इराण युद्ध : दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत अडकला रायगडमधील उत्कर्ष मपारा
Last Updated : March 3, 2026 at 3:50 PM IST