ETV Bharat / state

अमेरिकेसह इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भारतावर काय परिणाम होईल? आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला महत्त्वाचा इशारा

इराणवर हल्ला करून अमेरिका आणि इस्रायलनं मध्य पूर्वेत तणावाची स्थिती निर्माण केली आहे. त्याचा भारतावर काय परिणाम होईल, जाणून घ्या, सविस्तर

attack on Iran impact on India
अमेरिका -इस्रायलनं हल्ला केल्यानंतर नागरिकांची निदर्शने, उजवीकडे सतीश ढगे (Source- AP/ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 1, 2026 at 5:05 PM IST

|

Updated : March 1, 2026 at 7:06 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर - पश्चिम आशिया भागात वर्चस्व वाढवण्यासाठी अमेरिका प्रयत्नात असल्यानं इराणवर हल्ले करण्यात येत असल्याचं मत आंतरराष्ट्रीय विश्लेषक माजी लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं. "इराण सोबत भारताचे असलेले संबंध लक्षात घेता इतर देशांना सोबत घेऊन भारतानं अमेरिका आणि इस्राईल यांच्याशी युद्ध थांबण्याबाबत चर्चा करावी. युद्ध सुरू राहिल्यास कच्चे तेल महाग होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. मात्र, इराणमध्ये अमेरिकेच्या मताचं सरकार आल्यास भारताचा फायदा होईल", असं मतदेखील डॉ. ढगे यांनी व्यक्त केलं.


इराणनं मिसाईल तयार करू नये म्हणून प्रयत्न...इराणचं वर्चस्व वाढू नये आणि त्यांनी आण्विक अस्त्रे तयार करू नये, याकरिता अमेरिका रणनिती आखताना दिसत असल्याचं मत डॉ सतीश ढगे यांनी व्यक्त केलं. इराणचं वर्चस्व कमी करण्यासाठी जून 2025 मध्ये अमेरिकेनं न्युक्लिअर भागांवर हल्ले केले. तिकडे देशामध्ये अराजकता माजली असताना त्याचा फायदा घेण्यासाठी सत्तांतर करण्यासाठी अमेरिकेनं प्रयत्न केलं. फेब्रुवारीमध्ये केलेल्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह राजकीय नेते आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांचा हल्ल्यात खात्मा झाला. तिथे आपल्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा अमेरिकेचा मानस असल्याचं मत माजी लेफ्टनंट कर्नल ढगे यांनी व्यक्त केलं आहे.

भारतावर काय परिणाम होईल? (Source- ETV Bharat Reporter)


प्रत्युत्तर देण्याकरिता इराणकडून हल्ले... हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणनं सात देशात असणाऱ्या अमेरिकेच्या हवाई स्थळांवर हल्ला चढवला आहे. त्यामागं जगाचं लक्ष वेधत अमेरिका आणि इस्राईल यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं मत डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं. "या हल्ल्यांमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असल्यानं मोठ्या प्रमाणात प्रवासी त्यात अडकले आहेत. अशा परिस्थितीत इराणशी भारताशी असलेले संबंध लक्षात घेता योग्य पद्धतीनं मध्यस्थी करणं गरजेचं आहे. चीनसारख्या देशांना सोबत घेऊन अमेरिका, इस्राइल आणि इराणसोबत चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. इराणमध्ये असलेली भारताची गुंतवणूक, आयात होणारे कच्चे तेल यांच्यावर परिणाम झाल्यास अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही", असेदेखील डॉ. सतीश ढगे यांनी स्पष्ट केलं.



अमेरिकेला हवे आहे मर्जीतील सरकार- "इराणचं वर्चस्व कमी करण्यासाठी अमेरिकेला तिथे आपल्या मर्जीतील सत्ता हवी आहे. त्यामुळेच आता तेथील प्रमुख अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळे पर्याय सत्ता स्थापनेत येऊ शकतात. त्यात पहिला पर्याय म्हणजे राज्यसत्ता आणि दुसरा पर्याय म्हणजे 1980 पूर्वी असलेली राजेशाही किंवा तिसरी म्हणजे लोकांनी सत्ता हाती घेऊन नेतृत्व ठरवावं, असे तीन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. मात्र, इराणमध्ये लोकांनी स्वतःची सत्ता स्थापन करावी, त्यासाठी अमेरिका आग्रही आहे. पुढील काही तासांमध्ये हल्ल्यांमध्ये वाढ होईल. त्यामुळे तिकडची परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे", असे डॉ. सतीश ढगे यांनी म्हटलं.



भारताने भूमिका घेणे गरजेचे- "भारतानं मध्यस्थी करून इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यासोबत चर्चा करणं गरजेचं आहे. जगामध्ये अमेरिका दादागिरी वाढवत आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध देशांवर त्यांनी आयातकर लादले. आता इराणच्या प्रमुखांचादेखील खात्मा केला आहे. आम्ही म्हणतो तसंच वागा, अशी अमेरिकेची भूमिका होत चालली आहे. इराणमध्ये भारताची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. त्याशिवाय तिथून कच्चे तेलदेखील भारतात मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. मात्र, भारताचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि इतर बाबी लक्षात घेता इराणसोबत व्यापाराबाबत अनेक निर्बंध घालण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भारत कशी भूमिका घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे", असे मत निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा-

Last Updated : March 1, 2026 at 7:06 PM IST