ETV Bharat / state

महायुतीत नाराजीनाट्य कायम, एकनाथ शिंदेंनंतर आणखी एक घटक पक्ष नाराज

आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न महायुतीत सुरू असताना आता रामदास आठवले यांनी देखील आपली खदखद व्यक्त केली.

mahayuti government
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 29, 2025 at 7:58 PM IST

|

Updated : November 29, 2025 at 8:36 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या 'रिपब्लिकन' पक्षाकडं महायुतीकडून दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवली. रामदास आठवले यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

रामदास आठवले नाराज? : "आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं, महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाव्यात, त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या. मुंबई महापालिकेत 17 ते 18, तर पुणे महापालिकेत 20 जागा मिळाव्या," अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. "महायुतीच्या, विशेषतः आमची नैसर्गिक युती असलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावं," असंही आठवले म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

वादग्रस्त विधानं टाळा : पुणे महापालिकेसाठी वीस प्रभागांची यादी पक्षानं तयार केली असून, ती भाजपाकडं सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडं ही यादी देण्यात आलीय. "दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळं या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचं प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत," असं आवाहनही आठवले यांनी केलं.

विरोधकांवर जोरदार टीका : सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. या आरोपांचा आठवले यांनी समाचार घेतला. "गोरगरिबांना उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबवणे हा आमचा अधिकार आहे आणि ते आमचे कर्तव्य देखील आहे. विरोधकांकडं सत्ता असताना त्यांना योजना राबवता आल्या नाहीत," अशी टीकाही त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या मतांमध्ये वाढ करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

Ramdas Athawale
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

दरम्यान, आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न महायुतीत सुरू असताना आता रामदास आठवले यांनी देखील आपली खदखद व्यक्त केली. त्यामुळं महायुतीत आणखी एक मिठाचा खडा पडला असंच म्हणावं लागेल. हे नाराजीनाट्य किती दिवस चालेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. 'एकनाथ शिंदे भाजपाविरोधात भूमिका घेणार...'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
  2. पक्षांतरामुळे महायुतीत नाराजी नाही, एकनाथ शिंदेदेखील नाराज नाहीत, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
  3. उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज? म्हणाले, "काँग्रेसला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य"
Last Updated : November 29, 2025 at 8:36 PM IST