ETV Bharat / state

'आता नव्या पिढीला संधी द्यायला हवी'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय निवृत्तीच्या चर्चांना उधाण!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ प्रवासाचा उल्लेख करताना आता पूर्वीप्रमाणे जास्त काम करणं शक्य नसल्याचं सांगितलं.

Uninon Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 24, 2026 at 7:49 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग’ कार्यक्रमात बोलताना गडकरींनी आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ प्रवासाचा उल्लेख केला. तसेच, आता नव्या पिढीला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, असं सूचक विधान त्यांनी केलं. त्यामुळे गडकरी निवृत्तीचा विचार करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नितीन गडकरी 2014 पासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. रस्ते, महामार्ग आणि एक्स्प्रेसवेच्या मोठ्या प्रकल्पांमुळे त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

काटोल येथे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (ETV Bharat)

इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून गडकरींवर प्रचंड टीका : दरम्यान, अलीकडच्या काळात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरूनही गडकरी चर्चेत राहिले आहेत. त्यांनी इथेनॉलच्या वापराचे सातत्यानं समर्थन केलं आहे. मात्र, इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर आणि देखभालीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी काही वाहनधारकांनी केल्या आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनीही केंद्र सरकार आणि गडकरींवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी नव्या पिढीला संधी देण्याबाबत केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

‘नव्या पिढीला संधी द्यायला हवी’ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ प्रवासाचा उल्लेख करताना आता पूर्वीप्रमाणे जास्त काम करणं शक्य नसल्याचं सांगितलं. नव्या पिढीनं पुढे यावे आणि त्यांना काम करण्याची संधी मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय निवृत्तीबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, गडकरींनी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही.

‘आता जास्त काम करू शकत नाही' : कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपण सार्वजनिक जीवनात सक्रिय आहोत. या काळात अनेक चढ-उतार अनुभवले, विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि अनेक सन्मान मिळालं. मात्र, आता पूर्वीप्रमाणे जास्त काम करणं शक्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं. नवीन पिढीने पुढे यावं आणि त्यांना काम करण्याची संधी मिळावी, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या विधानामुळे गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. पण सोबतच, त्यांनी निवृत्तीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

‘तब्येत चांगली नसेल तर सत्ता आणि पदाचा उपयोग काय?’ : गडकरींनी आपल्या जीवनशैलीतील बदलांचाही उल्लेख केला. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात पक्षाचं काम करताना कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची सवय होती. प्रवासात मिळेल ते खाणं, साध्या पद्धतीनं राहणं आणि वेळेची पर्वा न करता संघटनेचं काम करणं, असा तो काळ होता, असं त्यांनी सांगितलं.

मात्र, कोरोनाच्या काळानंतर जीवनशैलीत शिस्त आणल्याचं गडकरींनी सांगितलं. आता नियमित योगाभ्यास करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राजकीय आणि सार्वजनिक जीवनात पद, सत्ता किंवा प्रतिष्ठेपेक्षा आरोग्य अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगत, ‘आरोग्यच चांगलं नसेल, तर सत्ता आणि पदाचा काय उपयोग?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी आत्महत्यांबाबत चिंता : गडकरींना शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरही चिंता व्यक्त केली. विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविणं आणि त्यांचे जीवनमान सुधारणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या उर्वरित सार्वजनिक जीवनात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक काम करण्याची इच्छा असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

राजकीय निवृत्तीची घोषणा मात्र नाही : गडकरींच्या विधानामुळे निवृत्तीची चर्चा सुरू झाली असली, तरी त्यांनी प्रत्यक्षात राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली नाही. ‘नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे’ हा विचार त्यांनी वाढते वय आणि आरोग्याच्या संदर्भात व्यक्त केला असण्याची शक्यता आहे. मात्र, काटोलमधील या वक्तव्यामुळे गडकरींच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांच्या भविष्यातील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

  1. पुण्यात पुढील दोन वर्षांत 60 हजार कोटींची कामे होणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  2. 'सध्या ना डावे, ना उजवे, आम्ही सगळे संधीसाधू अशी स्थिती'- नितीन गडकरी
  3. नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 शी संबंधित सर्व डीपफेक मजकूर तत्काळ हटवण्याचे आदेश जारी