भावाच्या मृत्यूचं कारण देत अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची 14 दिवसांची पॅरोलची मागणी
कारागृह प्रशासनानं मागणी फेटाळल्याच्या निर्णयाला सालेमकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय.


Published : January 7, 2026 at 10:01 AM IST
मुंबई : कुख्यात गुंड अबू सालेमनं मोठ्या भावाच्या मृत्यूचं कारण सांगत 14 दिवसांच्या पॅरोलकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं यावर राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश जारी केलेत.
काय आहे प्रकरण? - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम हा नोव्हेंबर 2005 पासून तुरुंगात आहे. त्याचा सावत्र भाऊ अबू हकीम अन्सारी याचा 15 नोव्हेंबर 2025 रोजी मृत्यू झालाय. भावाच्या मृत्यूनंतरच्या विधींना उपस्थित राहण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर अबू सालेमनं 14 दिवसांच्या आपत्कालीन पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याची मागणी फेटाळून लावली. याविरोधात अबू सालेमनं वकील फरहाना शाह यांच्यामार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केलाय. या अर्जावर मंगळवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आलीय. तेव्हा या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला या प्रकरणी आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केलीय.
कोण आहे अबू सालेम? - अबू सालेम हा 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर परदेशात पळून गेला होता. त्याच्यावर दहशतवादाशिवाय हत्या, हत्येचा कट रचणे, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. साल 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट खटल्यात दोषी ठरवण्यात आलं असून, न्यायालयानं त्याला यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलीय. सध्या तळोजा येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमला गुन्हेगार हस्तांतरण करारानुसार पोर्तुगालहून नोव्हेंबर 2005 मध्ये भारतात आणण्यात आलं. या करारानुसार भारत सरकार त्याला 25 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा देऊ शकत नाही.
हेही वाचाः

