भाजपा आता भारतीय नव्हे तर पाकिस्तान जनता पार्टी; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
राज्यातील ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील जाहीर सभेत भाजपावर अत्यंत तीव्र शब्दांत घणाघात केलाय.

Published : June 27, 2026 at 5:34 PM IST
अमरावती : भाजपा ही आता भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही तर पाकिस्तान जनता पार्टी झाली आहे. प्रभू श्रीरामांना भाजपाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भाजपा मुक्त राम आंदोलन छेडणार असून महाराष्ट्रातून त्याची सुरुवात होईल असा घणाघाती हल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज यवतमाळ येथे केला.
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.
शिवसैनिकांच प्रेम हाच माझा पावसाळा : सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानत भावनिक संवाद साधला. पावसाळ्यात झाडांवर नवी पालवी फुटते तसाच हा माझ्या आयुष्यातील पावसाळा आहे. काही सडलेली पान गळून गेली पण नव्या जोमाने उभे राहणारे कट्टर शिवसैनिक हीच शिवसेनेची खरी ताकद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
माझी चूक झाली, माफी मागतो : खासदार संजय देशमुख यांचा नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही ज्याला निवडून दिलं त्यानेच गद्दारी केली. त्यामुळं सर्वप्रथम माझे कर्तव्य आहे की यवतमाळ वाशिमच्या जनतेची मी माफी मागावी. तुम्ही त्याच्या बोटावर मतदानाची शाई लावली पण त्यानं तुमच्या विश्वासालाच काळं फासलं."
गद्दारांचा हमीभाव वाढला : शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांनी उपरोधिक भाषेत टीका केली. आधी आमदारांचा भाव 50 खोके होता मग खासदारांचा किती असेल निवडून यायचं, स्वतःचा भाव वाढवायचा आणि नंतर विकून जायचं हा त्यांचा उद्योग झाला असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शिवसेनेच्या बळावर विजय : लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींची लाट असल्याचा दावा करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, महाराष्ट्रानं भाजपाला रोखलं आणि शिवसेनेचे खासदार निवडून दिलं. जर मोदींच्याच नावावर निवडून येत असाल तर पक्षांतर करण्याची गरज काय होती? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
निधीचं राजकारण : आज जिथं भाजपाचा खासदार नाही आमदार नाही त्या भागात निधी देणार नाही असं भाजपाचे धोरण अतिशय गंभीर आहे. ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून आला नाही त्या भागात देखील भाजपाचे मतदार आहे. निधी न देणं हा भाजपाच्या मतदारांवर देखील अन्याय आहे. निधी मिळत नाही म्हणून आपला पक्ष सोडून भाजपात जाणं हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला समाजसेवा जनतेची सेवा करायची त्यासाठी निधी कशाला हवा. या लोकांना निधी जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या राजकीय सोयीसाठी वापरायचा आहे म्हणूनच त्यांनी गद्दारी केली असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजसेवा आणि लोक कल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा असलेला विदर्भात जनतेच्या पैशाचा वापर प्रामाणिकपणे जनहितासाठी झाला पाहिजे. असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांवरही टीका केली.
भाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी : आज रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा प्रत्येक गोष्टीवरून नागरिकांना संशयाच्या भवऱ्यात ढकललं जात आहे. त्यामुळं ही भारतीय जनता पार्टी नसून पाकिस्तान जनता पार्टी असल्यासारखं त्यांचं वर्तन झालं आहे अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली.
राम मंदिराशी गद्दारी : राम मंदिरातील गैरव्यवहारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. राम मंदिरासाठी शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्र पालथा घातलाय. हिंदूंच्या श्रद्धेवर उभारलेल्या मंदिरातच भ्रष्टाचाराच्या चर्चा होत असतील तर ही गद्दारी हिंदुत्वाशी आणि प्रभूची रामांशी आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपामुक्त राम आंदोलनाची घोषणा : आता आमचा राम भाजपाच्या तावडीतून मुक्त करायचा आहे. भाजपा मुक्त राम आंदोलन लवकरच सुरू होईल आणि त्याची पहिली ठिणगी महाराष्ट्रातून पडेल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
गद्दार दिसला की विचारात जाब : जिथे जिथे हा गद्दार दिसेल तिथे त्याला एक प्रश्न विचारा आणि तुला निवडून दिलं मग आमच्याशी गद्दारी का केली? जनतेचा विश्वास विकणाऱ्यांना माफ करू नका अशा गद्दारांना जाब विचारा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना संपवणं अशक्य : शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न झालेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह हिसकावलं, आमदार खासदार फोडले पण शिवसैनिकांची निष्ठा कोणी हिरावू शकलं नाही. जोपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात ही ज्वाला आहे तोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना कोणीही संपवू शकत नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आजपासून तयारीला लागा : भविष्यातील निवडणुकांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन-तीन वर्षांनी निवडणूक झाली तरी गद्दार आला पुन्हा संधी मिळता कामा नये. आज पासूनच भगव्याचा कट्टर शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा. ही लढाई केवळ निवडणुकीची नाही तर स्वाभिमान आणि विश्वासाची आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा -

