''विद्यार्थ्यांचं आंदोलन मी केलं,अशा अविर्भावात ते होते'', उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता उदय सामंतांचा टोला!
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नांदेड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

Published : August 6, 2026 at 2:15 PM IST
नांदेड : शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षसंघटनेकडे लक्ष देण्याचा सूचना त्यांनी केली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. ''दुसऱ्यांच्या आंदोलनात जाऊन पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत, आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं. आंदोलनावर आक्षेप घेतला नाही. विद्यार्थ्यांचं आंदोलन मी केलं, अशा अविर्भावात ते होते. हा माझा टोमणा नाही, टोमणे ते मारतात'', असा अप्रत्यक्ष टोला सामंत यांनी लगावला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर, जे ओबीसीतून प्रमाणपत्र मिळाले आहे, ते रद्द झाले आहे. यावर उदय सामंत यांना विचारले असता, ''विखे पाटील यांच्यासोबत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढू, मी सुद्धा सदस्य आहे. त्यावर चर्चा करून माहिती घेऊन बोलेन'', असे ते म्हणाले.
बहुचर्चित कृष्णूर हेलिप्लांट : नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित कृष्णूर हेलिप्लांट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण, उदय सामंत यांनी या प्रकल्पाबाबत अवघ्या एका दिवसात केलेल्या दोन वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी त्यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती नसल्याचं सांगत, "माहिती घेऊन सांगतो", अशी भूमिका मांडली. यामुळे हा प्रकल्प नेमका सुरू राहणार की नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.
रत्नागिरीतील पत्रकार परिषद : रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सामंत यांनी वेगळीच माहिती दिली होती. त्यांनी स्पष्ट केले की, "राज्यातील सर्व विमानतळ आणि एमआयडीसी क्षेत्रांसाठी एकच टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णूर हेलिप्लांटलाही त्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रकल्पावरील शुल्क कमी होऊन उद्योगांना दिलासा मिळेल", असे त्यांनी सांगितलं.
औद्योगिक क्षेत्रात संभ्रम : उद्योगमंत्र्यांच्या या दोन परस्परविरोधी वक्तव्यांमुळे आता राजकीय वर्तुळात आणि औद्योगिक क्षेत्रात संभ्रम वाढला आहे. एकीकडे प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे त्याच प्रकल्पाला नव्या धोरणाचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले जाते. त्यामुळे नेमकी सरकारची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एमएसएमईसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प : दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच हा प्रकल्प एमएसएमईसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली होती. कृष्णूर हेलिप्लांटमुळे नांदेडसह मराठवाड्यातील उद्योगांना चालना मिळेल. रोजगाराच्या संधी वाढतील आणि गुंतवणुकीला गती मिळेल, असा दावा त्यांनी केला होता. आता उद्योगमंत्र्यांच्या वक्तव्यांनंतर कृष्णूर हेलिप्लांट प्रकल्पाचे भवितव्य काय? सरकारची अधिकृत भूमिका नेमकी कोणती? या प्रकल्पावर अंतिम निर्णय कधी होणार, याकडे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं आहे. पुढील काही दिवसांत शासनाकडून याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -

