"निकाल आमच्याच बाजूनं लागणार'', शिवसेना पक्ष अन् चिन्हाच्या वादावर उदय सामंत यांचा दावा
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या कायदेशीर वादात न्यायालयाकडून आपल्याच बाजूनं अपेक्षित निकाल लागण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Published : September 1, 2026 at 2:37 PM IST
|Updated : September 2, 2026 at 1:19 PM IST
मुंबई : पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर युक्तिवादात आमची बाजू योग्य पद्धतीनं मांडली जाईल आणि त्यातून आम्हाला अपेक्षित निकाल मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते आज पत्रकारांशी बोलत होते. सामंत म्हणाले की, पक्षाबाबत आणि चिन्हाबाबत जो युक्तिवाद सुरू आहे, तिथे आमचे वकील योग्य पद्धतीनं आमची बाजू मांडतील; आणि त्यातून आम्हाला अपेक्षित निकाल मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक
देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) झालेल्या वाढीबद्दल सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ''देशाचा जीडीपी वाढला आहे, त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनापासून धन्यवाद देतो. शांत राहिले म्हणजे ते कुठे बोलतच नाहीत, अशी टीका काही लोक करतात; मात्र नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं देशाच्या जीडीपीमध्ये वाढ करून ती सिद्ध केली आहे.'"
''....त्या दिवशी तुम्हाला फार मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल''
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सामंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. ''ज्या दिवशी हे ऑपरेशन टायगर यशस्वी होईल, त्या दिवशी तुम्हाला फार मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल'', असा सूचक दावा त्यांनी केला. ग्रामपंचायत सदस्यांपासून सोसायटीच्या चेअरमनपर्यंत अनेक जण राजकीय समीकरणं बदलण्यासाठी तयार असल्याचंही सामंत म्हणाले. ''याचा अर्थ ते आमच्यासोबत यायला तयार आहेत, हे सगळ्यांना कळलेलं आहे'', असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरूनही सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला. ''केवळ एखाद्या एमआयडीसीच्या आसपासच्या रस्त्यांवर खड्डे आहेत म्हणून लोकांनी दुसऱ्या एमआयडीसीमध्ये जावं. लोकांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललं आहे, याकडे आधी पाहिलं पाहिजे'', असा टोला त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. ''दुसऱ्याला मार्गदर्शन करताना किंवा दुसऱ्यावर टीका करताना, आपल्या मतदारसंघात काय चालले आहे आणि आपल्या पक्षात काय चाललं आहे, हेही पाहिले पाहिजे'', असं सामंत म्हणाले. वरळीतील महिलांनी उपस्थित केलेल्या गटार, स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रश्नांचा दाखला देत त्यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, टँकर माफिया आणि संबंधित गैरप्रकारांबाबतही सामंत यांनी कारवाईची मागणी केली. ''टँकर माफियांच्या माध्यमातून काम होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे'', अशी आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
मुंबईकरांना महागाईचा धक्का! CNG 2 रुपयांनी महागला, PNG दरही वाढले; नवीन दर जाणून घ्या
भूखंडाचे आरक्षण बदलण्याची मुंबई फुटबॉल असोसिएशनची मागणी निरर्थक, बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

