ETV Bharat / state

अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार गायब; अपहरण झाल्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संशय

अहिल्यानगर शहरात मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याचा प्रकास समोर आला आहे. याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Two MNS candidates missing in Ahilyanagar
अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार गायब (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 1:23 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी, उमेदवारांची पळवापळवी अन् नाराजीनाट्याला ऊत आला आहे. अशातच अहिल्यानगरमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महापालिका निवडणुकीत उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन उमेदवार गेल्या 24 तासांपासून अचानक गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी बेपत्ता झालेल्या उमेदवारांची नावं आहेत. या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होत नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली आहे.

'भाजपा आणि राष्ट्रवादीच्या विरोधातील निवडणूक लढणारे उमेदवार' : शहरातील केडगाव परिसर हा संवेदनशील मानला जातो. या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनसेच्या उमेदवारांचं अपहरण करण्यात आलं असावं, असा गंभीर संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. बेपत्ता झालेल्या दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरोधात तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी बेपत्ता झालेल्या उमेदवारांची नावं असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांसह पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार गायब (ETV Bharat)

पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती : दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि तातडीने तपास सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनीही बेपत्ता उमेदवारांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, निवडणूक काळात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अपहरण झाल्याचा मनसेकडून आरोप : ​मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "गेल्या 24 तासांपासून या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही. निवडणूक बिनविरोध व्हावी, या उद्देशाने सत्ताधारी किंवा प्रबळ उमेदवारांकडून त्यांचं अपहरण करण्यात आलं असावं," असा आरोप सुमित वर्मा यांनी केला आहे.



हेही वाचा