पर्यटनासाठी गेले अन् जीव गमावला: सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खटकालीच्या डोहात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
खटकाली इथं पर्यटनासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन्ही विद्यार्थी अवघे १६ वर्षांचे होते.

Published : August 24, 2026 at 7:32 PM IST
अकोला : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खटकाली इथं पर्यटनासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन्ही विद्यार्थी अवघे १६ वर्षांचे होते. गिरीधर दाभाडे आणि कृष्णा झामरे असं या दोन्ही विद्यार्थ्यांचं नाव आहे. या घटनेमुळे अकोट शहरावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, अकोट शहरातील काही विद्यार्थी खटकाली परिसरात पर्यटनासाठी गेले होते. यावेळी दोन १६ वर्षीय विद्यार्थी डोहात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो अपयशी ठरला. या घटनेनंतर इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केली. परिसरातील नागरिकांनी त्यांना धीर दिला. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलांचा पाय घसरल्यानं ते पाण्यात पडल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर : या दुर्घटनेनं विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या अकाली निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पर्यटनस्थळी जाताना विशेषतः खोल पाण्याच्या ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांनी खबरदारी घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, वनविभागाच्या वतीनं याबाबत धबधब्याच्याजवळ जाताना काळजी घ्यावी, अशी सूचना आधीच केली होती. मात्र, इथं येणाऱ्या पर्यटकांकडून सूचनांकडं नेहमीच दुर्लक्ष केलं जाते.
खटकाली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील खटकाली येथे पर्यटनासाठी पावसाळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात. येथे असलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटक दूरदुरून येतात. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. धबधब्याच्या वरच्या कडांवर उभे राहून पर्यटक फोटो काढत असतात. वर्षी पावसाळा कमी असल्याने येथे पर्यटक उशिरा यायला सुरुवात झाली आहे. तसेच पाणी पातळी ही कमी आहे. हे विशेष.
हेही वाचा :

