काळजाचा थरकाप! भीषण ट्रॅक्टर अपघातात सख्ख्या भावांसह मामाचा मृत्यू!
नेवासा तालुक्यातील खरवंडी इथं ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात सोनईतील अल्पवयीन सख्ख्या भावांचा आणि त्यांच्या मामाचा मृत्यू झाला. या घटनेमुळं दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

Published : May 28, 2026 at 5:51 PM IST
अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील खरवंडी इथं झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा मृत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात दोन कुटुंबांचा आधार हिरावून नेणाऱ्या या घटनेनं सोनई आणि खरवंडी गावांवर शोककळा पसरली आहे.
सुट्टीसाठी गेले होते मामाच्या गावाला : सोनई येथील दत्तनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय 16) आणि विजय गणेश दरंदले (वय 14) यांना शाळेला सुट्टी असल्यामुळं ते बुधवारी सकाळी खरवंडीला आपल्या मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडं गेले होते. दिवसभर आनंदात गेलेला हा क्षण सायंकाळी काळानं हिरावून घेतला. सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरात ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यामुळं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. नेवासा इथं शवविच्छेदनानंतर सायंकाळी रामेश्वर मराठे यांच्या मृतदेहांवर खरवंडीला अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक आणि विजय या दोन्ही भावांच्या मृतदेहांवर सोनईला अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील वातावरण सुन्न झाले होते.
भीषण दुर्घटनेनं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला : अभिषेक आणि विजय हे प्रगतशील शेतकरी अर्जुन पाटीलबा दरंदले यांचे नातू तसंच माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब दरंदले यांच्या कुटुंबातील होते. तर रामेश्वर मराठे हे बाळासाहेब मराठे यांचे एकुलते एक पुत्र होते. दुसरीकडं गणेश दरंदले यांनाही अभिषेक आणि विजय दोन मुले होती. त्यामुळं या भीषण दुर्घटनेनं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं सोनई आणि खरवंडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा :

