त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकाला मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

Published : March 3, 2026 at 6:42 PM IST
|Updated : March 3, 2026 at 9:05 PM IST
नाशिक- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात एक मार्चला सुरक्षारक्षकांकडून भाविकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सुरक्षारक्षकांकडून भाविकांशी होणाऱ्या गैरवर्तनाचे प्रकार यापूर्वी घडलं असल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार देत सुरक्षारक्षकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच रविवारी (1 मार्च) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक भाविक गर्भगृहाजवळ दर्शनासाठी आला असता त्याची नियुक्त सुरक्षारक्षकाशी वाद झाला. यावेळी सुरक्षारक्षकानं त्याला ढकलले असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी अन्य सुरक्षारक्षकांनी एकत्र येत भाविकाला ढकलून मंदिराबाहेर काढण्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर देवस्थानातील सुरक्षारक्षकांच्या गैरवर्तनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देवस्थान ट्रस्टमधील सुरक्षारक्षकांच्या मुजोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या विरोधात भाविकांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु देवस्थान ट्रस्टला वारंवार पाठीशी घालत असल्याचा भाविकांकडून आरोप होत आहे.
सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल- त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अमोल बोराडे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली. त्यानंतर सुरक्षारक्षक पप्पू आचारी आणि तुकाराम बारुंगे( राहणार त्रंबकेश्वर) यांच्यासह अन्य तीन ते चार सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली.
भाविकानं माफीही मागितली- "भाविक हा नशेत असावा, असे त्याच्या वागण्यावरून दिसत होते. सुरुवातीला तो रांगेच्या ठिकाणी खूप वेळ बसून होता. तो गर्भगृहात जाण्यासाठी आग्रह धरत होता. मात्र, सोवळं नसल्यानं त्याला नकार देण्यात आला. मग, त्यांनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानं देवस्थानाच्या कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत केली आहे. या घटनेची सर्व नोंद देवस्थानच्या डायरीत करण्यात आली आहे. आम्ही पोलिसांना पाचारण केलं होतं. त्यानंतर भाविकानं आपली चूक मान्य करून माफीही मागितली आहे", अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी दिली.
चौकशीचे आदेश दिले- त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणार्या भाविकांना दर्शनासाठी पाच ते सहा तास लागतात. दर्शनाची वेळ संपल्यावर चार ते पाच हजार भाविकांना दर्शन न घेता परतावे लागते. जे दर्शन रांगेत असतात, त्यांना सुरक्ष रक्षकांचा जाच सहन करावा लागतो. "भाविकाला मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनानं घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
भाविकाला मारहाण करणं चुकीचं- "त्र्यंबकेश्वर भाविक मारहाण प्रकरण अतिशय गंभीर विषय आहे. चार-पाच जणांनी भाविकाचे कपडे फाडले. अशा पद्धतीनं मारणे मलादेखील पटलेलं नाही. हे योग्य नाही, म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. परराज्यातील भाविक निघून गेला आहे. तुम्ही कसे ठरवणार की तो ड्रग्ज पिलेला होता. जगातून- भारतातून लोक येतात. वारंवार असे प्रकार होणं चुकीचं आहे. ज्यांनी हा प्रकार केला, त्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवावे लागेल. त्याला व्यवस्थित समजवा, असे पोलिसांना सांगावे लागेल", असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-

