समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: खासगी प्रवासी बसची कंटेनरला धडक, एका प्रवाशाचा मृत्यू
सोमवारी सकाळी समृद्धी मार्गावर भीषण अपघात झाला असून त्यात एका 65 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले.

Published : August 31, 2026 at 2:42 PM IST
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला असून त्यात एका 65 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बसमधे एकूण तीस प्रवासी प्रवास करत होते, घटना घडल्यानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलं. मिळालेल्या माहिती नुसार संभाजीनगरच्या दिशेनं येणाऱ्या ट्रकवर ही बस धडकली असून अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. या अपघातात हेमंत दाभाडे (वय 65) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळी घडली घटना : सोमवारी सकाळी वैजापूर येथील प्रवासी घेऊन शिहोरी ट्रॅव्हलची बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाली. समृद्धी मार्गावर आल्यावर हडस पिंपळगाव जवळ ट्रकला मागच्या बाजूनं जोरदार धडक बसली. वेगानं धडक बसल्यानं बसची एक बाजू पूर्णतः घासली गेली. या घटनेत वैजापूर येथील हेमंत दाभाडे या 65 वर्षीय वयस्कर प्रवाशाचा मृत्यू झाला असून इतर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 473.6, हडस पिंपळगाव शिवारात घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३० प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच रस्ता सुरक्षा दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. पथकानं तातडीनं बचावकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
रोजचा प्रवास करणारे हेमंत यांचा मृत्यू : या अपघातात मृत्यू झालेले हेमंत दाभाडे वाळूज औद्योगिक वसाहतीत खासगी कंपनीत काम करत होते. रोज सकाळी ते बसनं प्रवास करून शहरात यायचे, तर रात्री परत घरी जात होते. नियमित वेळेला ते शहराकडं निघाले असता काळानं घाला घातला. अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचं मूळ कारण अद्याप समोर आलं नसून ग्रामीण पोलीस त्याबाबत तपास करत आहेत. जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काही जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :

