गणेशोत्सवाच्या तोंडावर वाईत मोठी दुर्घटना! प्रसिद्ध बावळेकर मूर्ती कारखान्याला भीषण आग, शेकडो बाप्पांच्या मूर्ती खाक
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच वाई एमआयडीसीतील गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग लागून मोठं नुकसान झालं आहे.

Published : September 2, 2026 at 3:00 PM IST
सातारा : वाई एमआयडीसीतील प्रसिद्ध ‘बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्या’ला मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत प्रचंड हानी झाली आहे. या घटनेत गणेशमूर्ती जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असतानाच ही घटना घडल्यानं गणेशभक्तांनी हळहळ व्यक्त केली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
स्थानिक कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव : वाई एमआयडीसीतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशमूर्ती कारखान्याला मंगळवारी (1 सप्टेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. या घटनेत वाईतील ‘बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्या’मधील मूर्ती जळाल्या. आग लागल्याची माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
आगीची भीषणता पाहून वाई नगरपालिका, गरवारे वॉलरॉक्स, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण, सातारा पालिका आणि किसन वीर साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आलं. पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पहाटे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं. गौरी आणि गणेशमूर्तीच्या रंग कामासाठी कारखान्यात रंगाचे डबे, थिनर आणि इतर रसायनांचा (केमिकल) साठा होता. केमिकल आणि रंगाच्या डब्यांमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली : कारखान्याला चोहोबाजूंनी आगीनं वेढलं होते. धुराचे लोट देखील उसळत होते. त्यामुळे विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत मदतकार्याला गती दिली. या घटनेत बावळेकर कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून अनेक तयार मूर्ती जळून खाक झाल्या आहेत.
हेही वाचा

