पोहण्याचा मोह नडला! ठाण्यात कळवा खाडीत बुडून तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ
ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कळवा खाडी, रेतीबंदर गणेश विसर्जन घाट याठिकाणी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Published : August 30, 2026 at 7:10 PM IST
ठाणे : ठाण्याच्या खाडीत झालेल्या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. कळवा रेतीबंदर येथील गणेश विसर्जन घाटाजवळ खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. रविवारी (30 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मुंबई-नाशिक महामार्गालगत रेतीबंदर येथील गणेश विसर्जन घाट परिसरात तीन व्यक्ती खाडीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं त्यात तिघेही बुडाले.
बचावकार्य सुरू : दुपारी या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी कळवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, नारपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, अग्नीशमन दलाचे वाहन आणि एक रेस्क्यू वाहन, तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, युटिलिटी वाहन, दोन रुग्णवाहिका आणि बोट दाखल झाली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) जवानांनीही एक बस आणि बोटीसह बचावकार्य सुरू केलं.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांनाही मृत घोषित केलं : अथक प्रयत्नांनंतर टीडीआरएफ जवानांनी खाडीमध्ये बुडालेल्या तीन तरुणांना सुमारे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं. रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे नेण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांनाही व्यक्तींना मृत घोषित केलं. मृतांची नावे आलम सय्यद (42), रिझवान सय्यद (42) आणि साहिल पोलंदास (30) अशी असून तिघेही मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होते.
हेही वाचा -
- मोठी बातमी! बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडालं, 24 कर्मचारी बेपत्ता; भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू
- कर्नाटकात मोठी दुर्घटना: वेंकटपुरा नदीत शिंपले गोळा करताना 8 जण बुडाले; मृतांमध्ये 7 महिलांचा समावेश
- राजस्थानच्या टोंकमध्ये मोठी दुर्घटना, बनास नदीत आंघोळीसाठी गेलेले १० जण बुडाले, ८ मुलांचा मृत्यू

