ETV Bharat / state

काळजाचा थरकाप! साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; राहाता तालुक्यातील धक्कादायक घटना

राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथील साठवण तलावात पोहण्याचा मोह नडल्यानं एमबीएच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

MBA STUDENTS DROWN IN RESERVOIR
साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2026 at 2:07 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : राहाता तालुक्यातील चंद्रापूर गावाजवळील साठवण तलावात बुडून एमबीएच्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत असून महाविद्यालयीन वर्तुळासह विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

उपचाराआधीच विद्यार्थ्यांचा मृत्यू : लोणी परिसरातील व्यवस्थापनाचं शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा समूह गुरुवारी दुपारी चंद्रापूर गावाजवळील साठवण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी तलावात पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना तलावातील पाण्याखालील खोल भागाचा अंदाज न आल्यानं तीन विद्यार्थी अचानक अडचणीत सापडले. पाण्याचा वेग आणि खोली अधिक असल्यानं ते बुडू लागले. घटनेची जाणीव होताच इतर विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि तरुण घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करून विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. काही धाडसी तरुणांच्या मदतीनं तिघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आलं. मात्र, पाण्यात बराच वेळ राहिल्यामुळं त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तातडीनं उपचारासाठी हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर : या दुर्घटनेत अभिषेक गंगाधर जाधव (वय 24, रा. सुरेगाव-शिंगणापूर, ता. नेवासा), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय 23, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तिघेही लोणी येथील व्यवस्थापन महाविद्यालयात एमबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांचे मित्र, नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या मुलांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा :

  1. पुणे हादरलं; विषारी दारू पिल्यानं तब्बल 17 जणांचा मृत्यू, अनेक जण अत्यवस्थ, परिसरात मोठी खळबळ
  2. 'जामीन रद्द करण्यासाठी एनआयएनं दाखल केलेली कागदपत्रं द्या': सुधा भारद्वाज यांची न्यायालयात धाव
  3. 'पार्ट टाईम नेते पंतप्रधान मोदींवर टीका करतात' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल