ETV Bharat / state

'हे शेवटचं आंदोलन आता माघार नाही'; मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा

12 सप्टेंबरला मुंबईत आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मुंबई आंदोलनासाठी 5 टप्प्यांचं नियोजन असून मराठा समाजाला तयारीचं आवाहन केलं.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 10:23 PM IST

|

Updated : August 29, 2026 at 11:03 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

जालना - मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आक्रमक इशारा दिलाय. “हे शेवटचं आंदोलन आहे. यामध्ये एकाही मागणीत माघार घेतली जाणार नाही,” असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तसंच 12 सप्टेंबरला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मुंबई आंदोलनासाठी महाराष्ट्रातील मराठा बांधवांना बोलावून नियोजन केलं जाणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. मुंबईत आंदोलन पाच टप्प्यात करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “तीन दिवसांत मराठ्यांना मुंबईला नेऊन परत आणणं आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे यावेळी पक्की तयारी करायची,” असं आवाहन त्यांनी समाजबांधवांना केलं.


“शांततेच्या आंदोलनातही उग्रता दिसली पाहिजे”
आंदोलन शांततेच्या मार्गानेच होईल, मात्र त्याची ताकद सरकारला जाणवली पाहिजे, असं जरांगे म्हणाले. “उग्र आंदोलनसुद्धा मराठ्यांच्या शांततेच्या पानात उग्र वाटलं पाहिजे,” असं जरांगे म्हणाले. मुंबईतील मराठा समाजाने आंदोलनासाठी येणाऱ्या समाजबांधवांची योग्य व्यवस्था करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. “मुंबईतील मराठ्यांनी फक्त जेवण कमी पडू देऊ नये,” असं जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील (ETV Bharat)


“मुंबईच नाही तर दिल्लीही हलवू शकतो”
सरकारवर जोरदार टीका करताना जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “मी काय चीज आहे हे अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंना माहिती आहे. मी साधं रसायन नाही,” असं ते म्हणाले. “मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण चालत नाही. एकदा प्लॅनिंग झाली तर मुंबईच नाही तर दिल्लीसुद्धा हलवू शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.


“12 तारखेपर्यंत मागण्या मान्य करा”
सरकारने 12 सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यास मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबई आंदोलनाची घोषणा करून पुढील लढ्याची दिशा ठरवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. “मी शेवटचा श्वास याच ठिकाणी घेईन, पण मागे हटणार नाही,” असं म्हणत जरांगे भावूक झाले.

“मला बदनाम करण्यासाठी AI चा वापर होईल”
आपल्याला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. “माझी माहिती गोळा करून AIच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल,” असा दावा त्यांनी केला. “सत्ता अमर नाही, माझा समाज अमर आहे. म्हणून ते मला त्रास देत आहेत,” असं म्हणताना जरांगे भावूक झाले.

शेतकरी आणि मुंबईच्या प्रश्नावरही सरकारवर टीका
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. तसंच मुंबईतील मराठी माणूस, परप्रांतीय, मराठवाड्यातील नागरिक आणि जैन समाजही सुखी नसल्याचा दावा त्यांनी केला. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “यांना माज आला आहे,” अशी टीका त्यांनी केली.

12 सप्टेंबरपर्यंत उपोषण सुरूच राहणार

मनोज जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबरपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तोपर्यंत सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. अन्यथा 12 सप्टेंबरला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे.

हेही वाचा...

  1. मराठा आरक्षण : ''शिंदे-फडणवीसांनी माझ्या लेकरांचा तळतळाट घेतला'', मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
  2. ''शेवटचा लढा आणि ओबीसींचं आरक्षण गाडा, हेच जरांगेंचं धोरण'', लक्ष्मण हाके यांचा थेट आरोप
Last Updated : August 29, 2026 at 11:03 PM IST