'मतदार यादीत एकही बांगलादेशी राहणार नाही'; किरीट सोमैया यांचं प्रतिपादन
राज्यात बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत माजी खासदार किरीट सोमैया यांनी आक्षेप घेत या भ्रष्टाचाराविरोधी मोहीम हाती घेतली आहे.

Published : February 27, 2026 at 5:30 PM IST
|Updated : February 27, 2026 at 7:30 PM IST
कोल्हापूर : राज्यात आतापर्यंत बांगलादेशींना तीन लाख जन्म प्रमाणपत्र दिली होती, ती आता रद्द केलीत. नवीन पनवेल इथं दोन महिन्यात दोन हजार जन्म प्रमाणपत्रं दिली होती. तर कोल्हापुरातील एका गावात जन्म प्रमाणपत्र दिल्याची मला माहिती मिळाली. त्यासाठी मी अधिकाऱ्यांना भेटणार आहे. हा मतदान शुद्धीकरण कार्यक्रम आहे. राज्याच्या मतदारसंघात एकही बांगलादेशी नागरिक राहणार नाही आणि एकही महाराष्ट्राचा नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाही. कोल्हापूर महापालिकेत 2025 मध्ये काही नोंदी झाल्या? त्याची माहिती मी मागवली आहे. याबाबत आठ दिवसात अहवाल देतील, अशी माहिती माजी खासदार किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.
फडणवीस काळात भ्रष्टाचार कमी झाला : "माझी भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरू आहे. भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते. मी एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण सोडलेलं नाही. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर न्यायालय आदेश देत असतं. मी केवळ मुद्दा समोर आणून देतो. नंतर संबंधित संस्था काम करते. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना जेवढा भ्रष्टाचार झाला होता, त्यापेक्षा कमी भ्रष्टाचार फडणवीस काळात झाला आहे. भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला असं म्हणता येणार नाही," असं किरीट सोमैया म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलणं टाळलं : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात विचारलं असता, "मी भ्रष्टाचाराविरोधात हातोडा उचलला होता. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर न्यायालय आदेश देत असतं. मी केवळ मुद्दा समोर आणून देतो नंतर संबंधित संस्था पुढे काम करते," असं सांगत मुश्रीफ यांच्यावर बोलणं टाळलं. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात विचारलं असता किरीट सोमैया यांनी "देवेंद्र फडणवीस सरकार कमिटेड असल्याचं सांगत त्यावर बोलण्यास नकार दिला. "पार्थ पवार यांच्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या प्रकरणात शासकीय भ्रष्टाचार झाल्यानं कोणतीही गय केली जाणार नाही. म्हणूनच दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसंच काही प्रकरणात आर्थिक कारवाई केली आहे, तर काही प्रकरणात प्रॉपर्टी जप्त केली आहे. मी हाती घेतलेलं भ्रष्टाचार विरोधी प्रकरण कधीही माघारी घेत नाही," असा विश्वास किरीट सोमैया यांनी व्यक्त केला.
सहा महिन्यात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र व मतदार विरहित महाराष्ट्र होणार : "निवडणूक आयोगानं घोषित केल्याप्रमाणं पहिल्या तीन महिन्यात बांगलादेशी मतदारांशी संपर्क साधून, मतदार यादीत दुरुस्ती केली जाणार आहे. तसंच पुढील सहा महिन्यात बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र व मतदार विरहित महाराष्ट्र होणार. प्रत्येकानं आपल्या गावात, आपल्या मतदारसंघात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र व मतदार यादीवर लक्ष दिलं पाहिजे," असा सल्ला किरीट सोमैया यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची घेतली भेट : मतदार याद्यांमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करत महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागानं केलेली नोंदणी संशयास्पद असल्याचं सांगत माजी खासदार किरीट सोमैया यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. गेल्या दोन ते तीन वर्षातील जन्माच्या नोंदी तपासणी करण्यात यावी. यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोमैया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं केली. "कोल्हापूरचे प्रशासन सतर्क आहे आणि नागरिक ही सजग आहेत. त्यामुळे असा कोणताही प्रकार झालेला नाही. तरीही आम्ही याबाबतची चौकशी करू," असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैया यांना दिलं.
हेही वाचा :

