बायांनो टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास जगायचं, प्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांनी महिलांना दिला आनंददायी जगण्याचा मंत्र
महिला दिनानिमित्त विदर्भातील प्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Published : March 3, 2026 at 11:54 AM IST
अमरावती : मंग म्हणाल सांगितलं नाही! हे खास वऱ्हाडी शैलीतलं वाक्य आज अमरावती शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचलं आहे. सोशल मिडियावरील रील्समधून लाखो महिलांच्या मानला भिडलेली ही ओळ म्हणजे रील स्टार प्रज्ञा राऊत यांची खास ओळख. त्यांच्या रील्स मनोरंजन करतात, पण त्या मागे दडलेली त्यांची जीवन कहाणी अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे.
आयुष्यात मोठा आघात, पण न हरलेली जिद्द : जिवापाड प्रेम करणारा नवरा आजाराशी झुंज देत असताना आणि अखेर कायमचा दूर गेल्यावर एका स्त्रीच्या आयुष्यात निर्माण होणारी पोकळी दुःख आणि असंख्य अडचणी हे सर्व प्रज्ञा राऊत यांनी जवळून अनुभवलं. पण त्या कोसळल्या नाहीत त्यांनी स्वतःला सावरलं, उभं केलं आणि स्वतःची नवी ओळख निर्माण केली. आज त्या हजारो महिलांसाठी आत्मविश्वासाचा प्रतीक बनल्या आहेत.
'एमएनडीसी'शी लढा हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट : रीलस्टार प्रज्ञा राऊत यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे, त्यांच्या पतीला झालेला एमएनडी अर्थात 'मोटर न्यूरॉन डिसीज' हा दुर्मिळ आणि असाध्य आजार. हा आजार नेमका कशामुळे होतो? याचं ठोस कारण नाही. तसेच, यावर निश्चित उपचारही नाहीत. 10 वर्षांपूर्वीच या आजाराची जाणीव झाल्यानं त्यांनी मानसिक आणि आर्थिक तयारी सुरू केली. पर्याय नव्हता, पण तयारी होती, असं प्रज्ञा राऊत ठामपणे सांगतात.
नैराश्यावर उपाय स्वतःला व्यस्त ठेवा : आजारपण ताण-तणाव आणि अनिश्चितता यांच्या छायेत जगताना नैराष्ट्र येणं स्वाभाविक होतं. पण मी स्वतःला गुंतवून ठेवलं. सुरुवातीला रील्स पाहायची नंतर डब्समॅश आणि डबल बनवण्याची. स्वतःचे अनुभव महिलांची शेअर करायची. हळूहळू हिल्स च्या माध्यमातून छोटीशी ही सुरुवात मोठ्या प्रवासात बदलली. मन रिकामं ठेवलं तर नकारात्मक विचार वाढतात म्हणून स्वतःला व्यस्त असा सल्ला प्रज्ञा राऊत महिला मैत्रिणींना देतात.
'महिलांनो व्यक्त व्हा' : महिलांनो व्यक्त व्हा, असं मी वारंवार महिलांना सांगते. अनेक महिला अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेतात. खरंतर असा ताण घेऊ नये. 85 टक्के आजार हे मानसिक तणावातून उद्भवतात. चाळीशीनंतर शरीरात होणारे बदल आणि त्यातून येणारा ट्रेस हा मोठा घटक आहे. डोळ्यातून सगळं बाहेर काढा.राग असेल तर रागाने आनंद असेल तर आनंदाने व्यक्त व्हा. महिलांनी मैत्रिणींचा असा ग्रुप ठेवावा जिथं मोकळेपणानं बोलता येईल आणि गोपनीयता राखली जाईल असा आग्रह प्रज्ञा राऊत यांचा आहे.
'बाई उभी तर घर उभं' : घरात पुरुष आजारी पडला तर बाई उभी राहते, पण बाईच कोसळली तर संपूर्ण घर थांबतं असं प्रज्ञा राऊत स्पष्ट संगीतात.यामुळं महिलांनी स्वतःसाठी वेळ काढावा, स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं असा ठाम संदेश प्रज्ञा राऊत देतात.
पुरुषांसाठी महत्वाचे सल्ला :
- पत्नीला सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती द्या
- गुंतवणूक, विमा, बँक व्यवहार याची तिला जाणीव असू द्या
- शासकीय कामांमध्ये तिला सोबत घ्या
- भावनिक निर्णयांपेक्षा व्यवहारिक निर्णय घ्या
- आज बाहेर पडताना परत येण्याची शाश्वती नसते. त्यामुळं संवाद वाढवा.
'25 वर्षांची प्रेमकहाणी ही विश्वासाची ताकद' : प्रज्ञा राऊत आणि त्यांचे पती अखिलेश कोंडे यांची प्रेमकहाणी ही 25 वर्षांची होती. अखिलेश हे 'बँक ऑफ टोकियो'मध्ये अमेरिकेत ब्रँच मॅनेजर होते. अमेरिकेत प्रज्ञा आणि अखिलेश दोघांना एकमेकांचा आधार होता. 'नवऱ्यानं बायकोला पाहिली पसंती द्यावी आणि बायकोनं नवऱ्याला', असा आमचा विश्वास होता, असं प्रज्ञा राऊत म्हणतात.
नवरा काहीही असला तरी तो आपल्या कुटुंबासाठी झटतो, असं सांगताना प्रज्ञा राऊत राऊत यांच्या डोक्यात पतीबद्दल आदर दिसतो. समाज काय म्हणेल, विचार करू नका. एकटी स्त्री असली की तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होतात, हे कटू वास्तव मांडताना, 'समाज काय म्हणेल, चार लोकं काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. गरज पडली की, हे चार लोकं दिसतही नाहीत," असं प्रज्ञा राऊत राऊत म्हणाल्या. आपण स्वच्छ आहोत हे आपल्याला ठाऊक असतं. समाजाला उत्तर देणं नव्हे तर आपण आरशात स्वतःच्या डोक्यात डोळे घालून बघू शकतो का? हे प्रश्न महत्त्वाचा असल्याचं प्रज्ञा यांनी सांगितलं.
'मंग म्हणाल सांगितलं नाही' : आपल्या प्रत्येक रील्सच्या अखेरीस 'मंग म्हणाल सांगितलं नाही', हे प्रज्ञा राऊत यांचं वाक्य अतिशय लोकप्रिय ठरलं. आपल्या या वाक्याबाबत प्रज्ञा राऊत म्हणतात की, लहानपणी घरात ऐकलेलं हे साधं वाक्य आहे रागात, प्रेमात, दम देताना म्हणाल सांगितलं नाही हे वाक्य एका रील्सदरम्यान तोंडातून सहज निघालं. आईचा व्हिडिओ बनविणाऱ्या माझा मुलानं हेच वाक्य प्रत्येक रील्ससाठी स्लोगन म्हणून वापरत जा, असा सल्ला दिला. खरं तर आज हेच वाक्य माझी ओळख बनलंय असं प्रज्ञा राऊत यांनी सांगितलं.

