नवस फेडण्यासाठी श्रीफळ आकाशात फेकण्याची अनोखी परंपरा, कोल्हापूरच्या 'या' गावच्या यात्रेचा स्वॅगच निराळा
ग्रामदैवत श्रीमहारुद्र बलभीम देवाकडं मागितलेला नवस पूर्ण होतो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर यात्रा काळात मंदिर परिसरात नारळ आकाशात फेकण्याची अनोखी परंपरा सुरू आहे.

Published : February 26, 2026 at 1:18 PM IST
|Updated : February 26, 2026 at 1:32 PM IST
कोल्हापूर- जानेवारी, फेब्रुवारी महिना म्हणजे गावागावातील यात्रा, जत्रा यांचा महिना. गावागावात असणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रांना अनेक ठिकाणी अनेक परंपरा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील हनिमनाळ गावच्या यात्रेलाही अशीच अनोखी परंपरा आहे. गावचं ग्रामदैवत श्रीमहारुद्र बलभीम देवाकडं मागितलेला नवस हमखास पूर्ण होतो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर यात्रा काळात मंदिर परिसरात नारळ आकाशात फेकण्याची अनोखी परंपरा गेली पाच ते सहा शतकं सुरू आहे.
नारळ आकाशात फेकून नवस फेडण्याची परंपरा : सध्या या देवाची यात्रा सुरू असून, यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नारळ आकाशात फेकून नवस फेडण्याची परंपरा पार पडली. राज्यातील अनेक ठिकाणी देवस्थान आणि यात्रांमध्ये नवस पूर्ण झाल्यानंतर नारळ फोडले जातात अथवा नारळाचं तोरण केलं जातं. मात्र या गावच्या यात्रेचा स्वॅगचं निराळा असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हनिमनाळ येथे राज्यातील सर्वात अनोखी यात्रा पार पडली, गावचं ग्रामदैवत श्रीमहारुद्र बलभीम देवाची ही यात्रा नुकतीच पार झाली, या यात्रेतील श्रीफळ सोहळा पार पडला.
राज्यातील पहिलाच हा यात्रा सोहळा असल्याचा दावा : यात्रा काळातील तिसऱ्या दिवशी आकाशात नारळ फेकण्याची परंपरा असलेला राज्यातील पहिलाच हा यात्रा सोहळा असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय, तर बलभीम देवाला नवस बोलल्यानंतर ते फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आकाशात नारळ फेकतात. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावकऱ्यांकडून सुमारे 2 हजार नारळ हवेत फेकले जातात, जमिनीवर पडलेले नारळ कोणताही गावकरी घेत नाही, तर बाहेरून आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून नारळाचं खोबरं दिलं जातं. या अनोख्या परंपरेमुळे बलभीम देवाच्या परिसरात हजारो नारळाचा खच पाहायला मिळतो. गावातील तरुण सर्व सुरक्षा बाळगून नारळ आकाशात भिरकावतात तर काही तरुण ते झेलण्याचा प्रयत्न करत असतात. भक्ती आणि शक्तीचा हा संगम फाल्गुन महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या यात्रेमुळे पाच दिवस चालतो. मात्र यात्रेच्या तिसऱ्या दिवशी साजरा होणारा श्रीफळ सोहळा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे.
अशी साजरी होते पाच दिवसांची यात्रा : गावचं ग्रामदैवत श्रीमहारुद्र बलभीम यात्रेसाठी गावातील ग्रामस्थ राज्य आणि देशात कुठेही असला तरी या यात्रेसाठी हमखास उपस्थित असतो. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्या दिवशी श्रींचा दंडवत आणि नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी पालखी भेट आणि यात्रेचा मुख्य आकर्षण असलेला श्रीफळ सोहळा तिसऱ्या दिवशी पार पडतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गावकरी करतात.
महाराष्ट्रासह कर्नाटक सीमा भागातूनही भाविक होतात दाखल : कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील हनिमनाळ गावच्या यात्रेचं खास वैशिष्ट्य असलेल्या श्रीफळ सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. नवस फेडण्याची ही अनोखी प्रथा आणि परंपरा अनेक भाविक याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी गावात उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतात. ग्रामदैवत श्री महारुद्र बलभीम यात्रा कमिटीच्या वतीने पाच दिवस गावात यात्रेचे चांगलं नियोजन आणि कार्यक्रम केले जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचाः
वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 6 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरला छोटा वीर

