बारामतीच्या पठारावर स्ट्रॉबेरीचा गोडवा; प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांची यशोगाथा
प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी बारामतीच्या पठारावर स्ट्रॉबेरीची लागवड केलीय. भरघोस उत्पन्न मिळत असल्यानं ते समाधानी आहेत.

Published : February 28, 2026 at 2:45 PM IST
|Updated : February 28, 2026 at 7:27 PM IST
बारामती - पुणे जिल्ह्यातला बारामती तालुका म्हटलं की डोळ्यासमोर उसाची हिरवीगार शेती उभी राहते. पारंपरिक पिकांवर आधारित शेती हीच या भागाची ओळख मानली जाते. मात्र याच बारामतीतील निंबूत येथील पठारी, उष्ण आणि तुलनेनं कोरड्या हवामानात स्ट्रॉबेरीसारखं थंड हवामानातील पीक घेऊन बारामतीतील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ प्रयोग म्हणून सुरू केलेली ही लागवड आज आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असून आधुनिक, विज्ञानाधारित शेतीचा मार्ग दाखवणारी ठरली आहे.
सूक्ष्म निरीक्षण आणि व्यवस्थापनावर भर - दीपक जगताप यांना अंजीर शेतीचा तब्बल 17-18 वर्षांचा अनुभव आहे. जवळपास सात एकर क्षेत्रावर त्यांची अंजीर बाग आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय घेतला. अनुभवी असलेल्या अनेकांनी बारामतीच्या हवामानात स्ट्रॉबेरी शक्य नसल्याचं सांगितलं, पण त्यांनी पिकाचं सूक्ष्म निरीक्षण आणि व्यवस्थापनावर भर दिला आणि स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घेतलं.

झाड काय सांगतं हे कळायला हवं - दीपक जगताप यांच्या मते, पिकाची ‘भाषा’ समजून घेणं हेच खरं तंत्रज्ञान आहे. पानांचा रंग, वाढ, हालचाली यावरून अन्नद्रव्यांची गरज ओळखणे, रोग येण्याआधी त्याची लक्षणे पकडणे आणि योग्यवेळी उपाययोजना करणे, हा त्यांच्या यशाचा पाया ठरला. थ्रिप्स, माईट्स किंवा मूळकुज यांसारख्या समस्यांवर त्यांनी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन केलं. “पानं पाहिली की झाड काय सांगतं हे कळायला हवं. खत किंवा औषध कधी द्यायचं हे निसर्गच शिकवतो,” असं ते सांगतात.

प्रतिकूल परिस्थितीतही पीक जोमानं वाढलं - जगताप यांनी वाई परिसरातून ‘विंटर’ वाणाची 10 हजार स्ट्रॉबेरी रोपं आणली. मात्र लागवड करताना त्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी परिस्थितीनुसार बदल केले. ऑक्टोबरच्या उष्णतेचा फटका बसू नये म्हणून त्यांनी लागवडीनंतर लगेच प्लॅस्टिक मल्चिंग न करता तीन आठवड्यांनी ते केलं. त्याचबरोबर उसाच्या पाचटाचा वापर करून ‘स्ट्रॉ मल्चिंग’ केल्यानं जमिनीचं तापमान नियंत्रणात राहिलं, ओलावा टिकला आणि रोपांना नैसर्गिक गारवा मिळाला. या सूक्ष्म हवामान व्यवस्थापनामुळं प्रतिकूल परिस्थितीतही पीक जोमानं वाढलं.

भावही चांगला मिळाला - या प्रयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं अर्थकारण. पारंपरिक उसासाठी एक एकर क्षेत्र आणि सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यातून साधारण 1.5 ते 2 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळतं. याउलट जगताप यांनी अवघ्या 10 गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी लेंडी खत आणि गांडूळ खताचा वापर केला. शेतामध्ये बेड तयार केलं आणि त्यावर स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. दोन महिन्यानंतर उत्पादन सुरू झालं सुरुवातीला उत्पादन कमी होतं. अगदी एका वेळेस 10 ते 20 किलो उत्पादन मिळत होतं. त्यामुळे सुरुवातीला तोटा होतो की काय? असं वाटत होतं. मात्र पुढे चांगलं उत्पन्न मिळालं भावही चांगला मिळाला. फक्त 5-6 महिन्यांत सुमारे 9 ते 9.5 लाख रुपयांचं उत्पादन मिळालं. खर्च वजा जाता त्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. या पिकासाठी त्यांना आत्तापर्यंत 4 लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. अजूनही पुढील दोन महिने या पिकाचं उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे आणखी साडेचार ते पाच लाखाचं उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कमी क्षेत्र, कमी कालावधी आणि जास्त उत्पादन, या सूत्रामुळे हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.

तरुणांनी प्रयोग करायला घाबरू नये - उत्पादनाबरोबरच मार्केटिंगवर त्यांनी विशेष लक्ष दिलं. स्थानिक बाजारावर अवलंबून न राहता कोल्हापूर, बेळगाव आणि बेंगळुरू बाजारपेठांमध्ये थेट माल पाठवला. लवकर लागवड केल्यामुळे सुरुवातीला प्रति किलो सुमारे 300 रुपयांपर्यंत दर मिळाला. नंतर दर कमी झाला तरी सातत्यपूर्ण उत्पादनामुळे उत्पन्न स्थिर राहिलं. 10 गुंठ्यांसाठी जवळपास 90 हजार रुपयांची रोपे घेणे हे धाडस होतं, पण त्यामागे अभ्यास आणि नियोजन होतं. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यासच ती फायदेशीर ठरते, असा त्यांचा विश्वास आहे. “शेतीमध्ये कष्ट तर आहेतच, पण विज्ञान आणि नियोजनाची जोड दिली तर शेती खूप काही देऊ शकते. तरुणांनी प्रयोग करायला घाबरू नये,” असा संदेश ते देतात.

कमी क्षेत्रातूनही मोठं उत्पन्न - दीपक जगताप यांचा स्ट्रॉबेरी प्रयोग हे दाखवून देतो की शेतीमध्ये हवामान किंवा परंपरा हे अंतिम बंधन नाही. योग्य पीक निवड, सूक्ष्म व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचं ज्ञान असेल तर कमी क्षेत्रातूनही मोठं उत्पन्न मिळू शकतं. बारामतीच्या निंबुत येथील पठारावर उमललेली ही स्ट्रॉबेरी केवळ गोड फळ नाही, तर बदलत्या भारतीय शेतीचं प्रतीक ठरत आहे. जिथे मेहनतीसोबत विज्ञान आणि धाडस यांची जोड यशाचा नवा मार्ग तयार करत आहे.

हेही वाचा..

