ETV Bharat / state

उद्योग पतंगांचा! अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना

मेहनत अधिक आणि उत्पन्न कमी असल्यानं आता व्यवसाय सुरू ठेवावा का? असा प्रश्न पडल्याचं मत पतंग बनवणाऱ्या व्यावसायिकांनी व्यक्त केलंय.

Many families are engaged in kite making year-round, but they are facing difficulties due to inflation in Chhatrapati Sambhajinagar
अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 11, 2025 at 5:36 PM IST

|

Updated : December 11, 2025 at 7:38 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांत हा सण येतो. संक्रांत आणि पतंगोत्सव हे समीकरण असून तरुणाई त्याची आतुरतेनं वाट पाहत असते. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून एकमेकांना आनंदाचा संदेश दिला जातो. मात्र, हे पतंग बनवण्यासाठी कारागीर आणि त्याचं कुटुंब वर्षभर मेहनत घेत असतं. शहरातील जवळपास तीनशेहून अधिक कुटुंबांचं पतंग बनवणं हे उदरनिर्वाहाचं साधन बनलंय. मात्र, त्यांची नवी पिढी या व्यवसायात अधिक पुढं जाऊ इच्छित नाही, अशी खंत पतंग बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या अनिल राजपूत यांनी व्यक्त केलीय. तसंच सर्वत्र महागाई वाढत असताना व्यवसायासाठी लागणारे साहित्य महाग झाल्यामुळं विक्रीत परिणाम होतोय. याशिवाय, मेहनत अधिक आणि उत्पन्न कमी असल्यानं आता व्यवसाय सुरू ठेवावा का? असा प्रश्न पडल्याचं मत पतंग बनवणाऱ्या व्यावसायिकांनी व्यक्त केलंय.

अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना (ETV Bharat Reporter)

पिढीजात पतंग बनवण्याचा व्यवसाय : "नोहेंबर, डिसेंबरपासून अवकाशात रंगबेरंगी पतंग उडताना दिसतात, संक्रातीच्या निमित्तानं बहुतांश ठिकाणी पतंग उडवण्याची प्रथा आजही कायम आहे. सर्वांना उडवावेसे वाटणारे पतंग मात्र आजही हातानेच तयार केले जातात. त्यासाठी बाराही महिने काही कुटुंब दिवसरात्र मेहनत घेतात. शहरातील राजाबाजार, बुडीलेन या भागांमध्ये काही कुटुंब पिढीजात पतंग बांधणीचाच व्यवसाय करत आहेत. कोणाच्या चार तर कोणाच्या पाच पिढ्या या व्यवसायात आहेत. जानेवारी महिन्यात सर्वाधिक पतंग उडवले जात असून त्यानंतर क्वचितच कोणी पतंगबाजी करत असेल, असं वाटत असलं तरी, हा व्यवसाय करण्यासाठी बारा महिने मेहनत करावी लागते," असं पतंग बनवणारे व्यावसायिक गोवर्धन राजपूत यांनी सांगितलं.

Many families are engaged in kite making year-round, but they are facing difficulties due to inflation in Chhatrapati Sambhajinagar
अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना (ETV Bharat Reporter)

कागदी पतंगांची मागणी अधिक : "शहरात तीनशेहून अधिक कुटुंबं पतंग व्यवसायात काम करतात. महिलांसह कुटुंबांतील सर्व मंडळी वेळ मिळेल तसं पतंग बनवण्यासाठी मेहनत घेतात. शहरात तयार झालेले पतंग जालना, बीड, जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर सारख्या शहरांसह राज्याबाहेर हैदराबाद, तेलंगणापर्यंत पाठवले जातात. फेब्रुवारी महिन्यापासूनच व्यापारी येऊन वर्षभरासाठी लागणाऱ्या पतंगांची बुकिंग करून जातात. त्यानुसार कामाला सुरुवात केली जाते. सुरुवातीला मर्यादित वेळ काम केलं जातं. मात्र, दिवाळीनंतर रात्री उशिरापर्यंत काम करून विक्रीसाठी मागणीनुसार पुरवठा केला जातो. तसंच प्लास्टिकचे डिझाईन पतंग बाजारात आले असले तरी आजही कागदी पतंगांची मागणी अधिक आहे," असं गोवर्धन राजपूत यांनी म्हटलंय.

Many families are engaged in kite making year-round, but they are facing difficulties due to inflation in Chhatrapati Sambhajinagar
अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना (ETV Bharat Reporter)

महागाईमुळं व्यवसायावर परिणाम : "पतंग दिसायला अगदी साधारण दिसत असला तरी त्याच्या निर्मितीवर महागाईचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. हैदराबाद येथील कागदाची खरेदी करावी लागते. तर त्यासाठी लागणाऱ्या काड्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागवल्या जातात. पूर्वी आठशे रूपयांना मिळणारी कागदाची रिम आता बाराशे रुपयांपर्यंत मिळते. तर पतंगासाठी लागणाऱ्या काड्यांचे दर देखील दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळं पतंग तयार करताना महागाईचा फटका बसतोय. पतंग व्यावसायिकांना त्याबाबत पूर्ण माहिती दिल्यावर ते थोडे नाराज होतात. तसंच कमी जास्त प्रमाणात ते आपली मागणी सांगतात. महागाईमुळं व्यवसायावर परिणाम होतोय," अशी खंत पतंग बनवणारे व्यावसायिक अनिल राजपूत यांनी व्यक्त केलीय.

या व्यवसायातून नवीन पिढी बाहेर पडतेय : अनेक कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय असला तरी नवीन पिढी मात्र या व्यवसायातून बाहेर येऊ पाहत असल्याचं मत अनिल राजपूत यांनी व्यक्त केलंय. त्यांनी सांगितलं की, "पतंग तयार करण्यामध्ये अख्खं कुटुंब स्वतःला झोकून देतं. जग कितीही पुढं गेलं असलं तरी आजही पतंग तयार करण्यासाठी कुठलंही यंत्र नाही. हातानेच ते तयार करावे लागतात. त्यासाठी बारा महिने सातत्यानं काम करावं लागतं. तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करावं लागतं. मात्र त्या मानानं उत्पन्न मिळत नाही, पण ती कला माझ्या अंगी असून आधीपासून हा व्यवसाय करत असल्यानं ते करत आलो आहे. मात्र, नवीन पिढी आता इतर काम करू इच्छित आहे. खाजगी नोकरी करून पतंग तयार करण्यात काही प्रमाणात मदत केली जाते. पण त्याकडे फायद्याचा व्यवसाय म्हणून पाहत नाही. त्यामुळं सध्याची काम करत असलेली पिढी आणि यानंतरची पिढी पतंग तयार करण्यात किती रमेल? हे सांगणं कठीण आहे," असं मत अनिल राजपूत यांनी व्यक्त केलंय.

Many families are engaged in kite making year-round, but they are facing difficulties due to inflation in Chhatrapati Sambhajinagar
अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना (ETV Bharat Reporter)

हातानं कसलेल्या मांजाची मागणी अधिक : याचबरोबर, "पतंग उडवायचा म्हटलं की, मांजा हा महत्वाचा असतो. काही वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर मांजा तयार करण्याचं काम केलं जायचं. वेगवेगळ्या प्रकाराचा मांजा जागोजागी तयार केला जात होता. त्यामुळं त्यांच्या किंमती आवाक्यात होत्या. मात्र, काळाच्या ओघात आता मांजा निर्मितीवर असणारे काम कमी झालं. सध्या रायबरेली येथून मांजा तयार होतो. येथून तो सर्वत्र पाठवला जातो. परिणामी त्यांच्या किंमती वाढतात. तर कुठं चायना मांजा देखील मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येतोय. पतंगबाजीच्या स्पर्धांमध्ये चायना मांजा वापरावर बंदी असल्यामुळं हातानं कसलेल्या मांजाची मागणी अधिक आहे", असंही अनिल राजपूत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. पुण्यात शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरू; महायुतीमध्ये बिघाडी
  2. 'मला गुन्हा कबूल नाही'; राज ठाकरे यांचं ठाणे न्यायालयात स्पष्टीकरण, एका महिन्यात विषय संपवणार
  3. चेतक फेस्टिवलमध्ये रंगल्या अश्व नृत्य स्पर्धा; गुजरात आणि राजस्थानच्या अश्वांनी मारली बाजी
Last Updated : December 11, 2025 at 7:38 PM IST