प्राध्यापकाची आदर्श शेती; मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या एकलासपूरमध्ये दर आठवड्याला 60 क्विंटल वांग्याचे उत्पादन
अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या एकलासपूर गावात प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी शेतीतून एक नवा आदर्श उभा केलाय.

Published : January 5, 2026 at 6:12 PM IST
|Updated : January 5, 2026 at 7:59 PM IST
अमरावती : अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या एकलासपूर गावात प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी शेतीतून एक नवा आदर्श उभा केलाय. परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख असलेले प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी आपल्या शेतात वांगी आणि खपली गव्हाची लागवड करून नोकरीसोबत शेती देखील यशस्वीपणे करता येते, हे दाखवून दिलंय. सध्या त्यांच्या शेतातून दर आठवड्याला तब्बल 60 क्विंटल वांगी अमरावतीच्या बाजारात विक्रीसाठी पाठवली जात आहेत.

नियोजन थोडं चुकलं, पण उत्पादन समाधानकारक : सप्टेंबर महिन्यात प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी आपल्या शेतात बारटोक कंपनीच्या वांग्याचे बियाणं एक एकर शेतात लावलं. यासोबतच काटेरी वांगी देखील शेतात लावली. "वांग्याच्या शेती नियोजनात काही चुका झाल्या. बेडवर लागवड आणि मल्चिंग करायला हवं होतं, पण तसं केलं नाही. असं असलं तरीही सध्या दर आठवड्याला 60 क्विंटल उत्पादन मिळतंय, याचं समाधान वाटतं," असं प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
जैविक पद्धतीवर भर : प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी शेतात जैविक पद्धतीवर विशेष भर दिला गेला. गोमूत्राची फवारणी, अळी नियंत्रणासाठी ताक आणि अंड्याचा वापर यासह घरच्या घरी तयार केलेले जैविक द्रव्य वापरून प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी रासायनिक खतांपासून जाणीवपूर्वक दूर राहणं पसंत केलं. "सकाळी सात ते साडेबारा वाजेपर्यंत महाविद्यालयाचे काम पूर्ण केल्यावर दिवसभरात केवळ दोन तास शेतीसाठी देऊन योग्य फवारणी, देखभाल आणि नियोजन केलं," असं प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी सांगितलं.

अमरावतीच्या बाजारात विक्री : "दर आठवड्याला सरासरी 60 क्विंटल वांगी शेतात निघत आहेत. गावातील महिला मजुरांच्या माध्यमातून वांगी तोडली जातात. वांगी तोडल्यावर कॅरी बॅगमध्ये भरून त्यावर कडुलिंबाची पानं ठेवली जातात. सध्या अमरावतीच्या बाजारात 40 रुपये किलो, असा भाव वांग्यांना मिळत आहे," असं प्रा. डॉ. एकनाथ तट्टे म्हणाले. याचबरोबर, पुढं त्यांनी सांगितलं की, "सप्टेंबर ते डिसेंबर या काळात संपूर्ण राज्यात वांग्याचे उत्पादन मर्यादित असतं. यामुळं या कालावधीत मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला बाजारभावाची चिंता भासत नाही. इथून पुढं जवळपास वर्षभर शेतातून मोठ्या प्रमाणात वांगी बाजारात जात राहतील," असं देखील प्रा. डॉ. एकनाथ तट्टे म्हणाले.

खपली गव्हाची देखील लागवड : एक एकर शेतामध्ये प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी खपली गव्हाची लागवड केलीय. खपली गव्हाचं बियाणं सांगली जिल्ह्यातून त्यांनी आणलंय. खपली गव्हाची लागवड पूर्णतः जैविक पद्धतीनं करण्यात आलीय. दरम्यान, "मार्च एप्रिल महिन्यापर्यंत हा दर्जेदार गहू आपल्या शेतात येईल," असं प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी सांगितलं.
तरुण शेतकऱ्यांनी हा प्रयोग पाहावा : "मी नियमित शेतात येत नाही. सर मात्र शेतात भरपूर मेहनत घेतात. कॉलेजमधील काम आटपून ते शेतात येतात. त्यांची सातत्याची मेहनत आज फळ देताना दिसते. वांगी, गहू सगळं पाहून खूप समाधान वाटतं," असं प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांच्या पत्नी वनिता तट्टे यांनी सांगितलं. तसंच, "नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांनी आमच्या शेतात सर जे काही प्रयोग करतात, ते पाहायला यावं आणि सरांकडून शेती देखील शिकावी," असं मतही वनिता तट्टे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :
- "कोर्टाच्या कर्मचाऱ्यांना चुकून इलेक्शन ड्युटी लावली होती", महापालिका आयुक्तांचं हायकोर्टात जातीनं हजेरी लावत स्पष्टीकरण
- छत्रपती संभाजीनगर साड्यांच्या सेलमध्ये तुफान गर्दी, चेंगराचेंगरीमध्ये महिला जखमी
- देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भाजपाचा एक गट सक्रिय : नाना पटोलेंचा दावा, म्हणाले 'सुधीर मुनगंटीवार . . . '

