ETV Bharat / state

"सुपारी देऊन फोडलेले कॅशबॉम्ब आता फुसके निघाले", महेंद्र दळवींचा सुनील तटकरे व चित्रलेखा पाटील यांच्यावर निशाणा

नागपूर अधिवेशनानंतर रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले असून महेंद्र दळवी यांच्या या आक्रमक वक्तव्यांमुळं सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Mahendra Dalvi
आमदार महेंद्र दळवी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 16, 2025 at 6:39 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

रायगड : नागपूर हिवाळी अधिवेशनावरून परतल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर त्यांनी थेट आणि तीव्र शब्दांत टीका केलीय. कॅशबॉम्ब, सुपारी राजकारण, उतरती कळा आणि पालकमंत्रीपद अशा मुद्द्यांवरून महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलाय.

कॅशबॉम्ब आता फुसके निघाले : "सुपारी देऊन फोडलेले कॅशबॉम्ब आता फुसके निघाले आहेत. मात्र, मी असा बॉम्ब टाकीन की, ते रोहा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सोडून पळून जातील," असं म्हणत महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केलीय. तसंच सुनील तटकरे यांना आता उतरती कळा लागली असून त्यांचे राजकीय वजन कमी होत चालले आहे, असा दावा महेंद्र दळवी यांनी केला. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील वक्तव्याकडे लक्ष वेधत महेंद्र दळवी म्हणाले की, "ते वक्तव्य सूचक असून लवकरच मंत्री भरत गोगावले यांच्या रूपानं रायगडला पालकमंत्री मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

ड्रग्ज घेऊन तर बोलत नाहीत ना? : दरम्यान, "महेंद्र दळवी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्यांच्यावर घरगुती हिंसाचारसह अनेक गुन्हे असून ते सर्वात जास्त गुन्हे दाखल असलेले आमदार आहेत," असा आरोप चित्रलेखा पाटील यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना महेंद्र दळवी यांनी अत्यंत आक्रमक भाषेत टीका केलीय. "चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन तर बोलत नाहीत ना?" असा गंभीर सवाल उपस्थित करत त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्यावर शंका व्यक्त केलीय. त्यांनी पुढं म्हटलंय की, "चित्रलेखा पाटील यांचं कुटुंब मी हद्दपार केलं असून त्यांच्या कुटुंबातच दोन गट पडले आहेत. अशा परिस्थितीत सुपारी घेऊन बालिश बुद्धीनं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही," असा घणाघात महेंद्र दळवी यांनी केलाय. एकंदरीत, नागपूर अधिवेशनानंतर रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले असून महेंद्र दळवी यांच्या या आक्रमक वक्तव्यांमुळं सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसतायेत.

हेही वाचा :

  1. गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरला अटक; 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  2. मृत्यू झाल्यानंतर तरुणाच्या व्हॉट्सअपवरून मैत्रिणीशी सुरू होतं चॅटिंग; पोलिसांनी तपास केल्यानंतर फुटलं मोठं बिंग
  3. मेळघाटातल्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची ऐतिहासिक ‘संसदवारी’