ETV Bharat / state

ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

ठाणे पोलिसांनी एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी हिंदी वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

Symbolic photo
प्रतिकात्मक फोटो (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 10:37 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित हॉटेलमधून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत 26 वर्षीय अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. ही अभिनेत्री इतर महिलांना वेश्या व्यवसायात ओढून दलाल म्हणून काम करत होती, अशी माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी मिळाली होती गुप्त माहिती : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एक महिला (मूळ बिहारी) वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या 'अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा'स प्राप्त झाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्या अभिनेत्रीशी संपर्क साधला. यानंतर अभिनेत्रीनं विविध हिंदी वेब सीरिज आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुली वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं. मोबदल्यात तिनं ग्राहकाकडून 25 हजार रुपयांची मागणी केली.

यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक बनून संबंधित आरोपीला मुलींना घेऊन एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितलं. 'अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष'ने हॉटेल परिसरात सापळा रचून अभिनेत्रीला अटक केली. चौकशीत तिनं कबूल केले की, ती हिंदी वेब सीरिजमध्ये काम करत होती. परंतु काम मिळत नसल्यामुळे तिनं वेश्या व्यवसाय करण्यास सुरुवात केली. प्रत्येक ग्राहकाकडून 25 हजार रुपये घेऊन त्यातील 10 हजार रुपये मुलींना देत होती आणि उर्वरित 15 हजार रुपये ती स्वतः ठेवत होती. या प्रकरणात पथकानं दोन मुलींची सुटका केली आहे. अभिनेत्रीविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'काम मिळत नसल्यामुळे वेश्या व्यवसायाकडे' : मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये राहण्याचा खर्च, तसेच सिरीयलसाठी स्वतःला मेंटेन ठेवण्याचा खर्च आणि हायफाय लाइफस्टाईलची आवड यामुळे पैशांची वारंवार गरज निर्माण होणं अनेक तरुणींसाठी अडचणीचे ठरतं. सिरीयलमधून काम मिळत नसल्यामुळे, अनेक तरुणी नाईलाजाने वेश्यावृत्तीच्या मार्गावर जाताना दिसून येतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

तसंच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, अशा प्रकारच्या घटनांचं प्रमाण रोखायचं असेल तर चांगलं शिक्षण घेऊनच मुंबई किंवा ठाण्यात येणं योग्य ठरेल. अन्यथा, अशा प्रकारच्या वाईट मार्गांवर जाण्याची शक्यता जास्त असते आणि यात तरुणींचा बळी जाण्याचीही भीती असते.

पुढील तपास सुरू : या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ''पीडितांची सुटका हा आमचा प्राधान्यक्रम आहे. या रॅकेटशी संबंधित इतर साथीदार आणि संभाव्य पीडितांचा शोध घेतला जात आहे,'' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं असून, या रॅकेटच्या आर्थिक आणि लॉजिस्टिक नेटवर्कचा सखोल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.