ETV Bharat / state

ठाणे महापालिकेच्या पहिल्याच सभेत जोरदार राडा, सत्ताधारी शिवसेना-भाजपा नगरसेवक आमनेसामने

ठाणे महापालिकेची पहिलीच महासभा सोमवारी झाली. या सभेत भाजपानं शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

Thane Municipal Corporation's
ठाणे महापालिकेच्या पहिल्याच सभेत जोरदार राडा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 6:11 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज सोमवारी (23 फेब्रुवारी) ठाणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा चांगलीच गाजली. खरं तर, ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपानं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पण महापालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या विरोधी पक्षांच्या मदतीनं सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

भाजपा, राकाँ (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले : प्रशासकीय काळातील कामकाजासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न आणि लक्षवेधी घेण्याऐवजी थेट विषयपत्रिकेला सुरूवात करून त्यास मंजुरी देत सभा विसर्जित केल्यानं भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. विषयपत्रिका सुरू असतानाच, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिवसेनेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादही झाल्याचं पाहायला मिळालं.

ठाणे महापालिकेच्या पहिल्याच सभेत जोरदार राडा (ETV Bharat)

नेमकं काय घडलं? : खरं तर, भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका नम्रता कोळी आणि राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक तथा गटनेते सुधीर भगत यांनी मागील 4 वर्षांचा लेखाजोखा सादर करण्याची मागणी केली. ठाणेकर नागरिकांचे प्रलंबित प्रश्न आणि प्रशासनाची केलेली कामं याबाबत उत्तरं मागितली. मात्र महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी अजेंड्यानुसार कामकाज सुरु करून झटपट सर्व विषय वाचून दाखवले. यानंतर प्रशासनानं महासभा गुंडाळली. पण यास भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं विरोध केला. मात्र, सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांकडूनही हा विषय पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न झाला.

अखेर, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व समित्या गठीत झाल्यानंतर सर्व प्रश्न उत्तरं आणि लक्षवेधी घेण्यात येईल, असं सांगत विषयपत्रिका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनानं विषयपत्रिका सुरू करताच, भाजपासह राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. विषयपत्रिका सुरू असतानाच, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिवसेनेला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुढील सभेत बोलू दिलं नाही तर उपमहापौर पदाचा राजीमाना देईल, असा इशारादेखील कृष्णा पाटील यांनी यावेळी दिला.


हेही वाचा