टीईटी पेपरफुटी प्रकरण: तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना रविवारी भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं.

Published : June 28, 2026 at 5:22 PM IST
ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणातील तपासाला भिवंडी पोलिसांनी वेग दिला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना रविवारी (28 जून) न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी आरोपींची 10 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयानं त्यांना 6 जुलैपर्यंत अर्थात 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान या प्रकरणामागे आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना रविवारी भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणातील आरोपी धीरज बलराज सिंग (28, हरियाणा), राजीव साव (45, बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (30, बिहार) यांच्याकडून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच या प्रकरणामागे आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत दोन संशयित आरोपी अद्याप फरार असल्याचंही सांगण्यात आलं.
पेपर नेमका कुठून मिळाला, महाराष्ट्रात त्याची आणखी कुठे विक्री झाली का? आर्थिक व्यवहार कोणासोबत झाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान, आरोपी धीरज सिंगच्या वकिलांनी त्याच्यावर यापूर्वी बॅरिएट्रिक (आतड्याशी संबंधित) शस्त्रक्रिया झाल्यानं नियमित औषधोपचाराची गरज असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर पोलिसांनी आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जात असल्याचं स्पष्ट केलं.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फरार आरोपींचा शोध, आर्थिक व्यवहारांचा तपास आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करण्यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे.
हेही वाचा
- पेपर फुटला, परीक्षा टळली! तणावाच्या वातावरणात सोशल मीडियावर शिक्षकांची 'मिश्कील' जुगलबंदी
- टीईटी पेपरफुटीचा पर्दाफाश; दिल्लीहून भिवंडीत आणला पेपर, दीड कोटींच्या व्यवहारापूर्वी तिघांना अटक
- टीईटी पेपरफुटीवरुन राजकारण तापलं, 'सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाला', रोहित पवारांचा हल्लाबोल, राहुल गांधी म्हणाले 'तरुण असुरक्षित'

