
TET परीक्षेच्या दिवशी निवडणूक प्रशिक्षण ठेवलं तर शिक्षकांची मोठी अडचण होण्याची शक्यता
निडणुकीच्या काळात टीईटी परीक्षेच्या दिवशी निवडणूक प्रशिक्षण ठेवलं तर अडचण होऊ शकते.


Published : November 5, 2025 at 8:31 PM IST
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. तसंच अर्ज दाखल करण्याची 17 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत असणार आहे. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. याचबरोबर, 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं 23 नोव्हेंबर रोजी टीईटी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळं निडणुकीच्या काळात टीईटी परीक्षेच्या दिवशी निवडणूक प्रशिक्षण ठेवलं तर अडचण होऊ शकते. त्यामुळं 23 नोव्हेंबर ही तारीख शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
परीक्षेला तब्बल 4 लाख 76 हजार परीक्षार्थी बसणार : टीईटी या परीक्षेला तब्बल 4 लाख 76 हजार परीक्षार्थी बसणार असून, त्यात सुमारे 1 लाख परीक्षार्थी हे राज्यातील विविध शाळांमधले कार्यरत शिक्षक आहेत. हेच शिक्षक निवडणुकीच्या काळात मतदान अधिकारी, सहाय्यक अधिकारी किंवा इतर कर्मचारी म्हणून काम करतात. निवडणुकीच्या आधी साधारण 8 ते 10 दिवसांत दोन प्रशिक्षण सत्रं घेतली जातात. पण जर यापैकी एखादं प्रशिक्षण 23 नोव्हेंबरला ठेवलं, तर शिक्षकांसाठी अडचण होऊ शकते.
राज्य निवडणूक आयोगाला आवाहन : "टीईटी परीक्षा ही शिक्षकांसाठी करिअरमधली अत्यंत महत्त्वाची आणि भविष्यासाठी निर्णायक मानली जाते. त्यामुळं त्या दिवशी कोणतंही निवडणूक प्रशिक्षण ठेवू नये," अशी मागणी पुण्यातील प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन मेमाणे यांनी केली आहे. तसंच त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आवाहन केलंय की, "शिक्षकांच्या हिताचा विचार करून 23 नोव्हेंबर रोजी कुठलंही प्रशिक्षण सत्र ठेवू नये. शिक्षक निर्धास्तपणे परीक्षा देऊ शकतील आणि निवडणूक प्रक्रियेलाही अडथळा येऊ नये. शिवाय, दोन डिसेंबरच्या निवडणुकीत अनेक परीक्षार्थी शिक्षक हे मतदारही असणार आहेत. त्यामुळं त्यांचा मतदानाचा हक्क बजावणंही तेवढंच महत्त्वाचं आहे."
पदोन्नतीसाठी टीईटी पास असणं बंधनकारक : आता टीईटी प्रकरण म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी आदेश दिलाय की, देशभरातील एक ते आठवीच्या सर्व शिक्षकांनी पुढच्या दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण करावी, अन्यथा सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. सेवेची पाच वर्षे उरलेले शिक्षकही पदोन्नतीसाठी टीईटी पास असणं बंधनकारक आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील हजारो शिक्षक हवालदिल झाले असून, आता टीईटी परीक्षा आणि निवडणूक प्रशिक्षण एकाच दिवशी ठेवलं तर शिक्षक अक्षरशः द्विधा मनःस्थितीत सापडतील, असं स्पष्ट दिसून येत आहे.
हेही वाचा :

