जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू; आर्थिक मदत देण्याची मागणी
जनगणनेचं काम करण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकेच्या दुचाकीला कंटेनरनं धडक दिल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Published : May 27, 2026 at 10:16 PM IST
|Updated : May 27, 2026 at 10:40 PM IST
मावळ (पुणे) : शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका शिक्षिकेचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात शोककळा पसरली आहे. दीपाली सुजित तांबे (रा. मंचर) असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे या जनगणनेच्या शासकीय कामासाठी सकाळी घरातून निघाल्या होत्या. त्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून आपल्या वाहनाने प्रवास करत असताना कान्हे फाटा परिसरात एका भरधाव कंटेनरनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. धडकेनंतर त्या गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी संबंधित कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिक्षक सुहास विटे यांनी सांगितलं की, " सध्या वाढत्या तापमानात जनगणनेचं काम करणं अत्यंत कठीण होत आहे. शिक्षकांना मोठ्या अंतरावर प्रवास करावा लागत आहे. या कामात महिला शिक्षकांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत सुरक्षिततेचे प्रश्न अधिक गंभीर ठरत आहेत. आज आमच्यातील एक शिक्षिका गमावली आहे. पण त्यांच्या कुटुंबासाठी कोणतेही ठोस आर्थिक संरक्षण नाही. शासनानं याची तातडीने दखल घेऊन शिक्षकांसाठी संरक्षण कवच आणि आर्थिक मदत योजना लागू करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.या घटनेमुळे प्रशासनाच्या कामात गुंतलेल्या शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्तव्य बजावत असतानाच जीव गमावणाऱ्या शिक्षिकेस योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
दरम्यान, शासकीय आदेशानुसार जनगणनेचं काम पार पाडण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा अशा प्रकारे अपघातात अंत झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण क्षेत्रातही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-

