'हर दिल मुंबई’च्या घोषणेसह 'टाटा मुंबई मॅरेथॉन'चा काऊंटडाऊन सुरू, यंदा 69 हजार धावपटू धावणार
यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनची खासियत म्हणजे यावर्षी एकूण 69,100 धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापैकी 65,400 हून अधिक धावपटू प्रत्यक्ष मुंबईत धावणार आहेत.

Published : January 9, 2026 at 7:35 AM IST
|Updated : January 9, 2026 at 7:44 AM IST
मुंबई : येत्या 18 जानेवारी रोजी टाटा 'मुंबई मॅरेथॉन'चं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मॅरेथॉनचं यंदाचं 21वं वर्ष आहे. दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या अंतिम काऊंटडाऊनला सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
'टाटा मुंबई मॅरेथॉन' ही केवळ एक शर्यत नसून, भारतातील सर्वात मोठं क्रीडा व्यासपीठ मानलं जातं. या मॅरेथॉनमध्ये समाजातील विविध स्तरांतील नागरिक सहभागी होत, नव्या सुरुवातीचा संकल्प करत ‘हर दिल मुंबई’ या हॅशटॅगखाली एकत्र धावण्यासाठी एकवटतात.
कशी असेल यंदाची स्पर्धा? : यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनची खासियत म्हणजे यावर्षी एकूण 69,100 धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापैकी 65,400 हून अधिक धावपटू प्रत्यक्ष मुंबईत धावणार असून, 3,700 पेक्षा अधिक धावपटू जगातील विविध शहरांतून व्हर्च्युअली मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
या मॅरेथॉनसाठी सहभागी वर्षभर नियमित सराव करत असतात. 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटरची अर्धमॅरेथॉन या प्रमुख स्पर्धांसह ज्येष्ठ नागरिकांची दौड, व्हीलचेअर रन यांचाही समावेश आहे. मात्र, सर्वाधिक सहभाग आणि सर्वात मोठं आकर्षण ठरतं ते ‘ड्रीमरन’, ज्यातून मुंबईच्या विविधतेचं रंग आणि मुंबईकरांचा खरा स्पिरीट अनुभवायला मिळतो. यंदाच्या फुल मॅरेथॉनमध्ये 14,059 धावपटूंनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे.
'हर दिल मुंबई'चा संदेश देत मॅरेथॉनचं आयोजन : ‘हर दिल मुंबई’ हा संदेश देत यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन दक्षिण मुंबईतील सीएसएमटीपासून वरळी-वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत पार पडणार आहे. मुंबईकरांचा उत्साह आणि शहराची ऊर्जा दर्शवणाऱ्या या सोहळ्याची कॉर्पोरेट कंपन्यांसह सर्वसामान्य नागरिक दरवर्षी आतुरतेनं वाट पाहत असतात. हा बहुप्रतिक्षित सोहळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी (8 जानेवारी) मुंबईत करण्यात आली.
यावेळी टाटा सन्सचे ब्रँड आणि मार्केटिंग प्रमुख एड्रियन टेरॉन म्हणाले, “टाटा मुंबई मॅरेथॉन ही एकता, अखंडता आणि प्रगतीचं शक्तिशाली प्रतीक आहे. ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून, मुंबईला नवी ऊर्जा देत नागरिकांमध्ये सहभाग, एकोपा आणि चिकाटीची भावना निर्माण करते.”
टीसीएसचे इंडिया बिझनेस अँड स्ट्रॅटेजिक अकाउंट्स अध्यक्ष उज्ज्वल माथूर यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “मॅरेथॉनमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते. यासोबतच पर्यावरण संवर्धन, लिंग समानता, शिक्षण आणि आरोग्य याबाबत सकारात्मक संदेश मॅरेथॉनच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचतो.”
'मुंबई मॅरेथॉनमधून अर्थव्यवस्थेला हातभार' : गेल्या वर्षीच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला 530.59 कोटी रुपयांचा हातभार लागला होता. तर मागील तीन वर्षांचा एकत्रित विचार करता, हा आर्थिक प्रभाव 1,182.67 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे प्रमुख तसेच माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णी यांनी दिली. यंदाच्या विक्रमी सहभागामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नमूद केलं.
हेही वाचा

