तर्रीपोहा विथ देवाभाऊ;नागपूरच्या विकासावर रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष संवाद सोहळा; शहरात 50 ठिकाणी थेट प्रक्षेपण
नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत अग्रस्थानी असलेल्या तर्री-पोह्याचा मनसोक्त आस्वाद घेत मुख्यमंत्री आज नागपूर शहराच्या विकासाचे व्हिजन लोकांसमोर ठेवणार आहेत.

Published : January 8, 2026 at 10:33 AM IST
नागपूर- महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराला अत्यंत कमी वेळ शिल्लक राहिलाय. त्यामुळे कमी वेळेत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय नेते आता रोज नवनवीन प्रयोग करू लागलेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलाखत घेतल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात मुलाखत आयोजित करण्यात आलीय. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत अग्रस्थानी असलेल्या तर्री-पोह्याचा मनसोक्त आस्वाद घेत मुख्यमंत्री आज नागपूर शहराच्या विकासाचे व्हिजन लोकांसमोर ठेवणार आहेत.
नागपुरात ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन - नागपूर शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि सरकारच्या विकास कार्याबद्दल समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी थेट चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपुरात ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरातर्फे आयोजित हा आगळावेगळा संवाद सोहळा आयोजित करण्यात आलाय.
नागपूरच्या चौकाचौकात थेट प्रक्षेपण- भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरातली सर्व प्रमुख 50 चौकात स्क्रीन लावून नागरिकांसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिलीय. या संवादाला अधिक रंजक करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुप्रसिद्ध हास्य कलाकार भारत गणेशपुरे हे त्यांची विशेष मुलाखत घेणार आहेत.
लोकांनी आपले मत नोंदवावे - नागपूरच्या विकासाचे व्हिजन मांडतानाच शहराची खास ओळख असलेल्या 'तर्री-पोहा'चा आस्वाद घेत हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. भाजपा नागपूर महानगरचे अध्यक्ष दयाशंकर तिवारींनी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना या सोहळ्याला उपस्थित राहून शहराच्या प्रगतीत आपले विचार मांडण्याचे आवाहन केलंय. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि नेतृत्वाचा संवाद असा हा दुहेरी संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचाः
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ कालवश; अहवालातून पर्यावरणाच्या संकटाचं केलं होतं भाकित
'मी गेल्यावर मला शहरात दफन करा'-एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचं भावनिक आवाहन

