पद्म पुरस्कार मिळाल्याचं खरं वाटत नाही, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त केली भावना
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्तानं संगमनेर इथं त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

Published : February 9, 2026 at 2:20 PM IST
अहिल्यानगर : जिल्ह्यातील संगमनेरचे पुत्र रघुवीर खेडकर यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्तान रविवारी (8 फेब्रुवारी) संगमनेर शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तमाशात सोंगाड्याची भूमिका करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना या लोककलेतील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, तमाशासाठी पहिल्यांदाच पद्म पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
नागरिकांच्या वतीनं कलाकार खेडकरांचा गौरव : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संगमनेर शहरातील कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहात नागरिकांच्या वतीनं कलाकार खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात शिस्तबद्ध परेडद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली. पुष्पवृष्टी करून त्यांचं व्यासपीठावर भव्य स्वागत करण्यात आलं. 'नटरंग उभा' हे नटरंग चित्रपटातील गीत सादर करून कलाकारांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं.
यावेळी व्यासपीठावरून खाली येत रघुवीर खेडकर यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना दंडवत घालून अभिवादन केलं. या भावनिक क्षणी खेडकर कुटुंबीयांसह उपस्थित अनेक रसिक प्रेक्षकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून अनेक चढ-उतार सामाजिक व आर्थिक अडचणी असूनही रघुवीर खेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या कलेसाठी समर्पित केलं आहे.
'तमाशा सामाजिक, सांस्कृतिक चळवळींची साक्ष' : या प्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गौरवोद्गार काढताना सांगितलं की, तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चळवळींची साक्ष आहे. 1857 चा उठाव, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोककलावंतांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. रघुवीर खेडकर यांनी अनेक अडचणींवर मात करत ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवली आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेक कलावंतांना आधार दिला. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संपूर्ण तमाशा क्षेत्रासह सर्व लोककलावंतांचा सन्मान आहे.
'पद्म पुरस्कार मिळाल्याचं खरं वाटत नाही' : रघुवीर खेडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की, आजही मला हा पुरस्कार मिळाल्याचं खरं वाटत नाही. महाराष्ट्रातील रसिकांचं प्रेम आणि संगमनेरकरांचे आशीर्वाद माझ्यासाठी सर्वांत मोठे आहेत. संगमनेर ही माझी कर्मभूमी असून या मातीनं मला संस्कार दिले. वयाच्या 9व्या वर्षी मी रंगमंचावर पाऊल ठेवलं. आज हा सोहळा पाहताना आईची प्रकर्षानं आठवण येते, अशी भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.
हेही वाचा
- 'भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच तमाशा कलावंताला मिळाला पद्म पुरस्कार', रघुवीर खेडकर यांची 'ईटीव्ही भारत'ला पहिली प्रतिक्रिया
- Gautami Patil : 'लोककलेची गौतमी करू नका, अन्यथा..', तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली खंत
- रघुवीर खेडकर आणि कांताबाई नगरकरांच्या तमाशाने रंगली नाटय संमेलनाची संध्याकाळ

