'भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच तमाशा कलावंताला मिळाला पद्म पुरस्कार', रघुवीर खेडकर यांची 'ईटीव्ही भारत'ला पहिली प्रतिक्रिया
लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना यंदाच्या वर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला.

Published : January 25, 2026 at 5:54 PM IST
|Updated : January 25, 2026 at 6:19 PM IST
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना यंदाच्या वर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला.
तमाशा कलावंतांकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलला - "भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच पद्म पुरस्कार हा तमाशा कलावंताला मिळालाय. हा पहिला पुरस्कार मला मिळतोय हा माझा नाही तर अवघ्या तमाशा क्षेत्राचा सन्मान आहे. येत्या काळात जाणकार व्यक्ती तमाशाचा अभ्यास करतील, तरुणही याचा अभ्यास करतील. तमाशामध्ये फार मोठी ताकद आहे. मोबाईल, टीव्हीच्या युगात माणसं तमाशा कलावंतांकडं चांगल्या नजरेनं पाहायला लागली आहेत. जुना दृष्टीकोन बदलला आहे," अशी भावना तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. तसंच तमाशाचं स्वरुप आता व्यावसायिक होत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच हा पुरस्कार त्यांनी तमाशा क्षेत्राला अर्पण केला.
पद्म पुरस्काराची घोषणा - केंद्र सरकारनं मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली. महाराष्ट्रातील अनेक भूमीपुत्रांना पद्म पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. दरम्यान, 2005 मध्ये महाराष्ट्र शासनानं तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा रघुवीर खेडकर यांच्या मातोश्रींना पहिला 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
रघुवीर खेडकर यांचा परिचय - महाराष्ट्रातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तमाशा संस्कृती टिकवण्यात आणि राज्याबाहेर तिचा प्रसार करण्यात रघुवीर खेडकर यांनी मोलाचं योगदान दिलं. गावखेड्यात तमाशा सादर करणाऱ्या रघुवीर खेडकर यांचा पद्मश्रीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खडतर होता. रघुवीर खेडकर यांना तमाशाची कला ही वारशात मिळाली. त्यांच्या मातोश्री या एक महान तमाशा कलावंत होत्या. बालपणापासूनच त्यांच्या मनात तमाशाविषयी प्रेम निर्माण झालं. रघुवीर यांनी आईचा वारसा पुढं सुरू ठेवत पारंपरिक लोकनाट्य तमाशाची परंपरा जपली. गेली अनेक वर्षे ते तमाशा मंडळाचे नेतृत्व करत आहेत.
कोरोना काळात दिला आधार - कोरोना काळात तमाशा कलावंतांवर वाईट दिवस आले होते. अनेक गावांमधील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी रघुवीर खेडकर यांनी तमाशा कलावंतांच्या मदतीसाठी सरकारकडं मागणी केली होती. त्यांना अनेक तमाशा कलावंतांचा पाठिंबा होता. कोरोना संपल्यानंतर तमाशा पुन्हा सुरू झाला. रघुवीर खेडकर हे पारंपरिक कला सादर करून गावखेड्यातील लोकांचं मनोरंजन करतात.
हेही वाचा -

