ETV Bharat / state

विश्व मराठी संमेलन 2026 : मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो- निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी गायक-संगीतकार जोडी अजय अतुल यांना 'कलारत्न' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

Vishwa Marathi Sammelan
विश्व मराठी संमेलन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 10:39 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपली मातृभाषा मराठी भाषेत शिक्षण घेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदापर्यंत मजल मारल्याचं प्रतिपादन केलं. ते नाशिक इथं आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

कला आणि साहित्य जोपासण्यासाठी राजाश्रय आवश्यक असल्याचं गवई यांनी नमूद केलं. राज्यातील कला व संस्कृती संतांनी जतन केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कलाकारांचा सन्मान केला, तर राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात कलाकारांना राजाश्रय मिळाला होता, असंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अशा संमेलनांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं सांगून गवई यांनी पुरस्कारप्राप्त कलाकारांचं कौतुक केलं. नाशिकसारख्या ऐतिहासिक नगरीत हे संमेलन होत असल्याचा अभिमान असल्याचंही सांगितलं.

मराठी भाषेचा विश्वगौरव व्हावा - राम शिंदे : मराठी भाषेचा विश्वगौरव व्हावा यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. भाषा ही समाजाला जोडण्याचे कार्य करते आणि मराठी भाषा त्याला अपवाद नाही, असंही ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या धर्तीवर मराठी भाषा विद्यापीठाच्या जिल्हास्तरावर शाखा सुरू कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा अधिक व्यापक प्रचार-प्रसार व्हावा, यावर त्यांनी भर दिला.

Vishwa Marathi Sammelan 2026
विश्व मराठी संमेलन नाशिक (ETV Bharat)

... हे प्रत्येकाचं कर्तव्य - नार्वेकर : दरम्यान, मराठी भाषेचे संवर्धन आणि गौरव करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. मराठी भाषेच्या प्रसारासाठी प्रत्येकाने संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही बळकट करण्यासाठी मराठी भाषा महत्त्वाची भूमिका बजावत असून तिचा व्यापक प्रसार होणं आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केलं.

Vishwa Marathi Sammelan 2026
विश्व मराठी संमेलन नाशिक (ETV Bharat)

'नाशिककरांनी विश्व मराठी संमेलन यशस्वी करून दाखवलं' : नाशिककरांनी विश्व मराठी संमेलन यशस्वी करून दाखविल्याचं मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं. विश्व मराठी संमेलन हे केवळ भाषेपुरते मर्यादित नसून मराठी संस्कृतीचे सर्वांग दर्शन घडवणारं व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील वर्षीचं संमेलन नागपूर इथं होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रदर्शनातील स्टॉल्सना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्थानिक कलाकारांनाही संमेलनात संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

युवा वर्गासाठी दरवर्षी ‘मराठी भाषेचा सेवेकरी’ हा पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. भाषेचे जतन व संवर्धन करणाऱ्या व्यक्तींना पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. पुढील दोन महिन्यांत लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जगातील पहिले वैश्विक भाषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

'मराठी भाषा सर्व भाषिक शाळांसाठी अनिवार्य' : मराठी भाषा हा विषय सर्व भाषिक शाळांसाठी अनिवार्य करण्यात आल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. त्याची अंमलबजावणी शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवरील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात शालेय शिक्षण विभागामार्फत मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केलं.

संमेलनात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संगीतकार जोडी अजय-अतुल यांना 'कलारत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं स्वरूप 5 लाख रुपये व सन्मानचिन्ह असं आहे.

हेही वाचा