संवेदनशीलतेचं आदर्शवत उदाहरण! विद्यार्थ्यांनीच स्वतःच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांचे भरले शैक्षणिक शुल्क
शहरातील विद्यार्थ्यांनी सहलीच्या पैशांचा वापर करून आपल्याच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मदत केली. या विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे.

Published : November 14, 2025 at 7:33 PM IST
|Updated : November 14, 2025 at 8:10 PM IST
छत्रपती संभाजीनगर- विद्यार्थी किती संवदेनशील असतात, हे दाखवून देणारे उदाहरण समोर आलं आहे. शहरातील सरस्वती भुवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहलीतून परत आल्यावर शिल्लक राहिलेले पैसे वायफळ खर्च करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी शाळेला दिला आहे. त्यातून तब्बल सहा विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यात आलं आहे.
सहलीच्या उर्वरित रकमेचं केलं नियोजन- शहरातील नामांकित असलेल्या सरस्वती भुवन प्रशालेची शैक्षणिक सहल ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आली. 25 ऑक्टोबर रोजी सहलीची दिनांक निश्चित झाल्यावर 15 हजार इतके शुल्क विद्यार्थ्यांना आकारण्यात आलं होतं. त्यामध्ये गाडी भाडे, राहण्याचे आणि फिरण्याचे नियोजन यासाठीच्या खर्चाचा समावेश होता. नियमानं करावा लागणारा विद्यार्थ्यांचा विमा या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला होता. जवळपास 90 विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाले. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी भरपूर मजा केली. परत आल्यावर शाळेतील शिक्षकांनी हिशोब केला असता प्रत्येक विद्यार्थी मागे 300 रुपये शिल्लक राहिले होते. मुख्याध्यापकांनी हे पैसे विद्यार्थ्यांना परत देण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दिली सहमती- शाळेनं सहलीचा हिशोब केल्यावर 90 विद्यार्थ्यांची 27 हजारांची बचत झाल्याचं लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला तीनशे रुपये परत देण्याचा निर्णय संबंधित शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी चर्चा केल्यावर घेतला. त्याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आली. इयत्ता 8 वी ते 10 वी कक्षेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी बैठक घेतली. काही विद्यार्थ्यांनी सदरील पैसे परत न घेता कोणाला तरी मदत करू, असा विचार मांडला. बैठकीत सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखानं शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सहमती दिली. विद्यार्थ्यांनी ठरलेला निर्णय मुख्याध्यापकांना कळविला.

पैशांचा अपव्यय टाळला- विद्यार्थी प्रतिनिधी श्रीवरद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना पैसे परत दिल्यावर त्यांनी ते घरी न देता त्यांचा वायफळ खर्च केला असता. कोणी पिझ्झा, बर्गर किंवा शीतपेय पिले असते, तर कोणी काही वेगळा खर्च केला असता. यंदा राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. काही विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत. तर काहींना पालकच नाहीत. काही जणांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्यानं त्यांच्यासाठी या पैशांचा उपयोग व्हावा, अशी संकल्पना मांडली. त्याला सर्व विद्यार्थ्यांनी होकार दिला. खूप जास्त नाही, मात्र मदतीचा खारीचा वाटा उचलण्यात आनंद झाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
सहा विद्यार्थ्यांना मिळाली मदत - विद्यार्थ्यांनी दिलेल्या मदतीच्या हातानं शाळेतील सहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शाळेनं भरल्याची माहिती मुख्याध्यापक निकुंभ यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मदतीचा निर्णय केल्यानंतर शाळा संचालकांना याबाबत माहिती दिली. त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मदतीची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत आवश्यकता असणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली. इतक्या कमी वयात त्यांनी समाजाला दिलेला संदेश प्रोत्साहन देणारा आहे. काही पालकांनी आवश्यकता भासल्यास आणखी मदत देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मुख्याध्यापक विश्वरुप निकुंभ यांनी ईटीव्ही भारतला दिली.

