जिल्हा परिषद शाळांमधील २५ विद्यार्थी निघाले नासाला, गाव सोडून बाहेरही न गेलेल्या विद्यार्थ्यांची अमेरिकावारी
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळामधील २५ विद्यार्थी नासाला चालले आहेत. गाव सोडून बाहेरही न गेलेले हे सर्वसामान्य घरातील विद्यार्थी अभ्यास सहलीकरता थेट अमेरिकेला जात आहेत.

Published : November 14, 2025 at 7:11 PM IST
|Updated : November 14, 2025 at 8:15 PM IST
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला नवे पंख देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे २५ विद्यार्थी नासाला भेट देण्यासाठी उद्या पहाटे अमेरिकेला रवाना होणार आहेत. कधीही गावाबाहेर न गेलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी आता थेट अमेरिकेला जाऊन नासा येथे भेट देणार आहेत आणि तिथं जाऊन नासा विषयी जाणून घेणार आहेत.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय आयुक्त तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही मुलं मुंबईला रवाना झाली असून पहाटेच्या विमानाने ती अमेरिकेला जाणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज रुजवण्यासाठी जिल्हा परिषदेने नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठवण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यासाठी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) आयोजित तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परीक्षेत १३ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ७५ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ५० विद्यार्थी इस्रोला आणि २५ विद्यार्थी नासाला जाणार आहेत. याआधी ५० विद्यार्थी हे इस्रोला गेले असून आज २५ विद्यार्थी हे नासा रवाना होणार आहेत. या विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा दौरा असणार आहे.
या दौऱ्याबाबत इंदापूर तालुक्यातील उमर शेख या विद्यार्थ्यानं सांगितल की, आमच्या शाळेत नासाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर आयुका येथे मुलाखत झाली. त्यात निवड झाल्यानं आता आम्ही नासा येथे जाणार आहोत. आम्हाला खूपच जास्त आनंद होत आहे. तिथं जाऊन नासाबाबत अभ्यास करणार आहोत. तसंच गुगल, मेटा यांच्या कार्यालयात देखील भेट देणार आहोत. नासा येथे जाऊन शास्त्रज्ञांनी काय काय शोध लावला आहे. तसंच त्यांचा कामाची पद्धत काय असते हे मला तिथे जाऊन बघायचं आहे असं यावेळी त्याने सांगितलं.

यावेळी भास्कर तावरे या विद्यार्थ्यानं सांगितल की, आम्ही जिल्ह्याच्या बाहेर देखील गेलेलो नाही. आज आम्ही थेट अमेरिकेला नासा बघायला जाणार आहोत. आम्हाला खूपच छान वाटत आहे. नासाला भेट देऊन तिथं कशा पद्धतीनं संशोधन केलं जात आहे, हे पाहणार आहोत. त्यानंतर मला भारतात देखील भारतासाठी चांगलं संशोधन करायचं असल्याचं यावेळी त्याने सांगितलं.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले की, पुणे मॉडेल स्कूलचा प्रकल्प आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू केल्यानंतर विविध प्रकल्प हे हाती घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मुलांना बाहेर जाण्याची तसंच चांगल्या संस्था पाहण्याची खूप कमी संधी मिळत असते. पण या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा संस्थांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ही मुलं पहिल्यांदा विमानात बसून बाहेरच्या देशात जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञानाच्या बाबत विद्यार्थ्यांच्या मनात जागृती निर्माण होईल आणि पुढे शैक्षणिक वाटचालीत या मुलांना त्याचा फायदा होणार आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे. सुरुवातीला पहिली बॅच इस्रो येथे पाठविण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील विविध शाळांमधील २५ मुलं नासा येथे जाणार आहे. हे विद्यार्थी नासा येथे जाऊन तेथील शास्त्रज्ञांशी चर्चा करणार आहेत. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे. आयुकाच्या माध्यमातून परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. नक्कीच या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
हेही वाचा...

