शाळेत दाखला काढायला आलेल्या विद्यार्थ्याची सटकली, जुन्या वादातून शिक्षकावर हल्ला, चाकूने केले सपासप वार
लिटिल फ्लॉवर या नामांकित शाळेत चक्क विद्यार्थ्यांने शिक्षकाच्या पोटात चाकू मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Published : June 30, 2026 at 9:06 PM IST
|Updated : June 30, 2026 at 9:39 PM IST
छत्रपती संभाजीनगर - आधुनिक युगात काय होईल सांगता येत नाही. त्याची प्रचिती शहरातील शाळेत आली. लिटिल फ्लॉवर या नामांकित शाळेत चक्क विद्यार्थ्यांने शिक्षकाच्या पोटात चाकू मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सदरील विद्यार्थी 2023 मध्ये नववी कक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. त्यानंतर सदरील विद्यार्थी शाळेत दाखला काढण्यासाठी आला असताना वर्गशिक्षकासोबत वाद झाला. त्यातूनच त्याने स्वतःकडे असलेला चाकू त्यांच्या पोटात खुपसला. यामध्ये शिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे. हल्ला करणारा विद्यार्थी विधीसंघर्ष बालक असून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली आहे.
विद्यार्थ्याने केला हल्ला - शहरातील छावणी परिसरातील नामांकित 'लिटिल फ्लॉवर' शाळेत भरदुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने दाखला देण्याच्या कारणावरून विशाल फ्रान्सिस दुसिंग या शिक्षकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल फ्रान्सिस दुसिंग असे जखमी झालेल्या शिक्षकचे नाव आहे. ते लिटिल फ्लॉवर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते शाळेत असताना, एक माजी विद्यार्थी तिथे आला. मुख्याध्यापकांना दाखला काढण्यासाठी मागणी केली. त्यावेळी मुख्याध्यापकांनी त्याच्या वर्गशिक्षकांना बोलावून घेतले. त्यावेळी विद्यार्थ्याने शिक्षकांशी वाद घालण्यास सुरुवात केळी. जुना वाद उकरून काढत हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या माजी विद्यार्थ्याने खिशातील धारदार चाकू काढून थेट शिक्षक दुसिंग यांच्यावर सपासप वार केले.
शिक्षकावर उपचार सुरू - विद्यार्थ्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी शिक्षक विशाल दुसिंग यांना शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या माजी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत. सदरील विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत असल्याची माहिती छावणी पोलीस ठाणे निरीक्षक डॉ विवेक जाधव यांनी दिली आहे.
हेही वाचा - लोकल ट्रेनमध्ये तरुणाची चाकूने हत्या करणारा आरोपी अखेर अटकेत, छातीवर आणि पोटावर केले वार

