ETV Bharat / state

सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग! बुलढाण्यातील युवा शेतकऱ्यानं साधली किमया

चिखलीतील एक युवा आणि प्रयोगशील शेतकरी पृथ्वीराज विलास चव्हाण यानं सेंद्रिय पद्धतीनं स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

Strawberry Farming : A young farmer Prithviraj Chavan from Buldhana has achieved this feat
सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 6, 2026 at 4:08 PM IST

|

Updated : February 6, 2026 at 6:40 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका हा पारंपरिकपणे सोयाबीन पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतेक शेतकरी सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आदी पारंपरिक पिकांवर अवलंबून असतात. मात्र, ओला-कोरडा दुष्काळ, अनियमित पाऊस, वाढता खर्च आणि बाजारातील अस्थिर दर यामुळं शेतीत तोटा होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत शेतीकडे नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असताना, चिखलीतील एक युवा आणि प्रयोगशील शेतकरी पृथ्वीराज विलास चव्हाण यानं सेंद्रिय पद्धतीनं स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

10 गुंठे शेतात स्ट्रॉबेरीचे पीक : पृथ्वीराज सध्या कृषी महाविद्यालय, बारामती इथं बी.एस्सी. (कृषी) तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. कृषी शिक्षणासोबतच पृथ्वीराज चव्हाणला शेतीत नवे प्रयोग करण्याची आवड आहे. त्याचे वडील विलास चव्हाण हे कांदा बियाणे उत्पादन शेतकरी आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान पृथ्वीराज चव्हाणची प्रगत स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी भेट झाली. या भेटीमुळं पृथ्वीराज चव्हाणला स्ट्रॉबेरी पिकाची प्रेरणा मिळाली. त्यानं आपल्या 10 गुंठे शेतात स्वतः स्ट्रॉबेरी रोपांची निर्मिती केली आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं लागवड केली. तसंच रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून, नैसर्गिक खतांचा आणि जैविक नियंत्रणाचा अवलंब केला.

सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग! बुलढाण्यातील युवा शेतकऱ्यानं साधली किमया (ETV Bharat Reporter)

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी : दरम्यान, या प्रयोगातून पृथ्वीराज चव्हाणला भरघोस उत्पादन मिळालं. सध्याच्या बाजारभावानुसार स्थानिक बाजारात स्ट्रॉबेरीला 500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दररोज 20 ते 25 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पन्न निघत असून, येत्या तीन महिन्यांत एकूण 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची पृथ्वीराज चव्हाणला अपेक्षा आहे. अवघ्या 10 गुंठ्यात इतकं मोठं उत्पन्न मिळवणं हे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. पृथ्वीराज चव्हाणचा हा प्रयोग केवळ वैयक्तिक यश नसून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय उभा करणारा आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना सुद्धा युवा शेतकऱ्यानं आवाहन केलं आहे की, "पारंपरिक पिकांसोबतच फळझाडांची शेतकऱ्यांनी लागवड करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जवळ नगदी पैसा खेळत राहील. छोट्या शेतातही मोठा नफा कमावता येईल."

हेही वाचा :

  1. मुंबईहून पुण्याकडं जाणारी लेन संथ; खंडाळा घाटात कोंडीसदृश स्थिती, पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुन्हा वाहतूक कोंडी
  2. राष्ट्रवादीच्या प्रचार सभेतील बॅनरवरून नवा वाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो गायब
  3. आशियातील पहिली ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण 'एली'; पिटा इंडियातर्फे पहिल्यांदाच रोबोटिक हत्तीचे सादरीकरण
Last Updated : February 6, 2026 at 6:40 PM IST