ETV Bharat / state

संत साहित्यावर वक्तव्य; गोविंदगिरी महाराज यांच्या विधानाने वारकरी संप्रदाय संतप्त

गोविंदगिरी महाराज यांच्या संत साहित्यावरील वक्तव्यावरुन वारकरी संप्रदायातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. संत एकनाथ, संत नामदेव हे काही कमी नव्हते असं वारकरी म्हणतायत.

गोविंदगिरी महाराज यांच्या विधानाने वारकरी संप्रदाय संतप्त
गोविंदगिरी महाराज यांच्या विधानाने वारकरी संप्रदाय संतप्त (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 5:10 PM IST

|

Updated : March 4, 2026 at 8:42 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - संत साहित्याबाबत केलेल्या विधानामुळे गोविंदगिरी महाराज यांच्याविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून राज्यात नव्या वैचारिक वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर वारकरी अभ्यासक आणि अनुयायांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संतांच्या वाङ्मयाबाबत कोणताही कमी-अधिकपणा दाखवणे अयोग्य असल्याची भूमिका वारकरी संप्रदायाने स्पष्ट केली आहे.


गोविंदगिरी महाराजांनी संत साहित्याच्या परंपरेचा उल्लेख करताना काही ग्रंथ आणि संतांच्या कार्याला दुय्यम ठरवल्याचा आरोप वारकरी अभ्यासकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ परंपरेचे प्रवर्तक समर्थ रामदास स्वामी यांच्या अनुयायांमध्ये आणि वारकरी संप्रदायात वैचारिक मतभेद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोविंदगिरी महाराज यांच्या विधानाने वारकरी संप्रदाय संतप्त (ETV Bharat)


वारकरी संप्रदायाचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. बालाजी महाराज जाधव यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. “वारकरी संप्रदायाची परंपरा ही समतेची आणि सर्व संतांच्या विचारांचा सन्मान करणारी आहे. आधारभूत ग्रंथांना कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. संत साहित्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची अमूल्य ठेव असून त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव मान्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.


संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनीदेखील गोविंदगिरी महाराजांच्या दाव्यांना उत्तर देताना म्हटलं की, समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार करणे स्वागतार्ह असले तरी त्यासाठी इतर संतांच्या वाङ्मयीन योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे योग्य नाही. “महाराष्ट्रातील संत परंपरा ही विविध विचारधारांचा संगम आहे. कोणत्याही एका प्रवाहाला उंचावण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणे ही परंपरेच्या मूलभूत तत्वांना छेद देणारी बाब आहे,” असं ते म्हणाले.


दरम्यान, वारकरी संप्रदायानं हे वक्तव्य पूर्णपणे फेटाळून लावलं असून संतांच्या शिकवणीत समता, बंधुता आणि अध्यात्मिक एकात्मता यांनाच महत्त्व दिलं जातं, अशी भूमिका मांडली आहे. या वादामुळे येत्या काळात वारकरी आणि समर्थ संप्रदायांमध्ये वैचारिक संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत असली तरी संत परंपरेतील एकात्मतेचा संदेश कायम राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा...

  1. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन; आठवले, शिरसाट, सामंत काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
Last Updated : March 4, 2026 at 8:42 PM IST