दहावीच्या इंग्रजी परीक्षेत गैरप्रकार; पर्यवेक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अमरावतीमध्ये दहावीच्या इंग्रजीच्या परीक्षेवेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पर्यवेक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Published : March 1, 2026 at 1:51 PM IST
अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील डीसी 18 परीक्षा केंद्रावर दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परिक्षेदरम्यान उत्तर पत्रिकांबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक सुधीर खोडेसह उपपर्यवेक्षक आणि अन्य संबंधितांसह पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाल्यामुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
असं आहे प्रकरण : शुक्रवारी झालेल्या इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परिक्षेसाठी डीसी 18 या केंद्रावर मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तीन माध्यमातील विद्यार्थी परीक्षा देत होते. यामध्ये मराठी माध्यमाचे 1,992, इंग्रजी माध्यमाचे 443 आणि उर्दू माध्यमाचे 431 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा झाल्यानंतर उत्तर पत्रिकांची मोजणी करताना इंग्रजी माध्यमात 443 पैकी 442 तर उर्दू माध्यमात 431 पैकी 430 उत्तरपत्रिका प्राप्त झाल्याचं आढळून आलं. यात प्रत्येकी एक उत्तरपत्रिका कमी असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या शर्टमध्ये दोन उत्तरपत्रिका आढळल्या. त्यामुळं परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
- पोलीस ठाण्यात तक्रार : परीक्षा केंद्राचं कामकाज दुपारी साडेतीनपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. उत्तरपत्रिकांच्या संकलनात विसंगती आढळल्यानंतर उपशिक्षणाधिकारी रजनी शिरसाट यांनी अंजनगाव पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली.
पाच जणांविरुद्ध गुन्हा : याप्रकरणी पर्यवेक्षक सुधीर खोडे, उपपर्यवेक्षक कुमार अभ्यंकर, आणि अनिल हाडोळे यांच्यासह दोन विद्यार्थ्यांविरोधात अंजनगाव सुर्जी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. भारतीय दंडविधानातील संबंधित कलम तसेच महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा आणि इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम 1982 अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अंजनगाव सुरजीचे पोलीस निरीक्षक सुरज मुंडे यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात खळबळ : पोलिसांकडून परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीनं चौकशी सुरू आहे. या घटनेमुळं दहावीच्या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधितांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
परीक्षा कॉपीमुक्त करण्यात शिक्षण विभाग अयशस्वी : राज्यभरात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. भरारी पथकं तर तैनात आहेतच, पण सीसीटीव्ही तसंच ड्रोनद्वारेदेखील परीक्षा केंद्रांवर नजर ठेवली जात आहे. तरीदेखील काही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचं दिसून आलं. शिक्षण विभागाच्या ड्रोन व्हिडिओमध्येच कॉपी होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभाग अपयशी ठरल्याचं दिसत आहे.
कॉपी पुरवल्याचे व्हिडिओ आले समोर : यापूर्वी बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील आर्ट अँड सायन्स कॉलेजमध्ये काही नागरिक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचं ड्रोन व्हिडिओ समोर आले आहेत. शिक्षण विभागानं प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, तरीदेखील काही नागरिक आपल्या पाल्यांना कॉपी पुरवत असल्याचा ड्रोन व्हिडिओ सध्या शिक्षण विभागानं जारी केला आहे.
हेही वाचा :

