महिला हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या सोनिया गिल यांचे निधन
महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात अनेक वर्षे आवाज उठविणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सोनिया गिल यांचं मुंबईत निधन झालंय.

Published : August 26, 2026 at 4:04 PM IST
मुंबई : महिला हक्क, सामाजिक न्याय आणि महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात अनेक वर्षे आवाज उठविणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सोनिया गिल यांचं मुंबईत निधन झालंय. त्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (एआयडीडब्ल्यूए)च्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्या होत्या. त्यांच्या निधनाने महिला चळवळीतील एक सक्रिय आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सोनिया गिल यांचे पती ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ आहेत. त्यांच्या निधनाची माहिती सहकाऱ्यांनी दिली. दुपारी 12.30 वाजता लीलावती रुग्णालयातून त्यांचे पार्थिव वांद्रे रेक्लमेशन येथील 27 सागर संगम या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर दुपारी 1 वाजता पार्थिव सीपीएमच्या वरळी येथील जनशक्ती पक्ष कार्यालयात नेण्यात आले असून, दुपारी 2.30 वाजता तेथून दादर स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघेल आणि दुपारी 3.30 वाजता दादर इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
2004 पासून महिलांच्या प्रश्नांवर सक्रिय : सोनिया गिल अनेक वर्षांपासून एआयडीडब्ल्यूएच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर काम करत होत्या. 2004 मध्ये वसई येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेत चार जणांची हत्या झाली होती. या घटनेनंतर एआयडीडब्ल्यूएच्या मुंबई समितीने पीडित कुटुंबाला मदत केली. त्यावेळी एआयडीडब्ल्यूए मुंबई समितीच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गिल यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. या प्रकरणात पोलिसांकडून पुरेशी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सोनिया गिल यांच्यासह एआयडीडब्ल्यूएच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. पोलीस तपास आणि पीडित कुटुंबाच्या सुरक्षेबाबत त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता.
महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज : महिलांवरील हिंसाचार, लैंगिक अत्याचार, ऑनर किलिंग, महिलांची सुरक्षितता आणि महिलांना समान अधिकार मिळावेत, यासाठी सोनिया गिल यांनी सातत्याने भूमिका घेतली. विविध महिला संघटनांसोबत त्यांनी मुंबईत अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. एआयडीडब्ल्यूएच्या माध्यमातून त्यांनी केवळ एखाद्या घटनेनंतर आंदोलन करण्याऐवजी महिलांवरील हिंसाचारामागची सामाजिक कारणे आणि महिलांना कुटुंब व समाजात समान स्थान मिळण्याचा प्रश्नही मांडला.
महिला आरक्षणासाठीही भूमिका : महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी महिला आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलनांमध्येही सोनिया गिल सहभागी होत्या. महिलांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अधिक जागा मिळाल्याशिवाय समानतेचा उद्देश पूर्ण होणार नाही, अशी भूमिका महिला संघटनांकडून मांडली जात होती.
पायल तडवी प्रकरणातही आंदोलन : 2019 मध्ये डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात मोठा संताप व्यक्त झाला होता. वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना होणारा छळ आणि भेदभावाचा मुद्दा या प्रकरणामुळे चर्चेत आला. या प्रकरणातही सोनिया गिल यांनी आवाज उठविला होता. विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी व्यवस्था असावी, तसेच संस्थांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी महिला आणि विद्यार्थी संघटनांनी केली होती.
सामाजिक प्रश्नांवरही सक्रिय : सोनिया गिल यांचे काम केवळ महिला प्रश्नांपुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थी, कामगार, ग्रामीण भागातील नागरिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या प्रश्नांवरही त्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी होत. एआयडीडब्ल्यूएच्या कार्यक्रमांमध्ये त्या सातत्याने सक्रिय होत्या. त्यांच्या भाषणांमध्ये महिलांचे प्रश्न, सामाजिक समानता आणि लोकशाही हक्क हे प्रमुख मुद्दे असत. एआयडीडब्ल्यूएच्या विविध कार्यक्रमांच्या उपलब्ध नोंदींमध्ये त्यांचा महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी म्हणून उल्लेख आढळतो.
पी. साईनाथ यांच्यासोबत सामाजिक काम : सोनिया गिल यांचे पती ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे ग्रामीण भारतातील प्रश्नांवर दीर्घकाळ काम करत आहेत. सोनिया गिल यांचाही सामाजिक चळवळींशी दीर्घ संबंध होता. त्यामुळे मुंबईतील सामाजिक, महिला आणि डाव्या विचारांच्या चळवळींमध्ये या दोघांची उपस्थिती अनेक वर्षे पाहायला मिळाली. सोनिया गिल यांच्या निधनाने महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविणे आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, हे त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले.
हेही वाचाः

