सोमनाथ मंदिराची गौरवगाथा! गझनीच्या 17 स्वाऱ्या, प्रचंड लूट आणि आता 'स्वाभिमानाचं पुनर्निर्माण'
सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणांचा इतिहास आणि मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व याविषयी इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

Published : January 11, 2026 at 11:13 AM IST
अमरावती : आजच्या अफगाणिस्तानातील गझनी येथील सुलतान मोहम्मद गझनी यानं सुमारे एक हजार वर्षांपूर्वी भारतावर आक्रमणं केली. या आक्रमणांदरम्यान त्याच्या सैन्यानं अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. मोहम्मद गझनीनं एकूण 17 वेळा भारतावर स्वाऱ्या केल्या, यात त्यानं सोरटी सोमनाथ मंदिराची मोठ्या प्रमाणावर लूट केली. या ऐतिहासिक घटनेला यावर्षी एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे, मोहम्मद गझनीनं उद्ध्वस्त केलेल्या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली करण्यात आला. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानं हा पुनर्निर्माणाचा निर्णय घेण्यात आला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणांचा इतिहास आणि मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व याविषयी इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
मंदिर लुटण्यासाठी झालेल्या स्वाऱ्या : "चालुक्यांच्या काळात सोरटी सोमनाथ मंदिर बांधण्यात आलं होतं, असा इतिहासात उल्लेख आहे. हे मंदिर महाभारतातही उल्लेखलेलं आहे. मंदिर वारंवार लुटलं गेलं आणि पुन्हा उभारलं गेलं. भारतीयांसाठी हे मंदिर आस्थेचं महत्त्वपूर्ण केंद्र राहिलेलं आहे. सोरटी सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गझनीनं एकूण 17 स्वाऱ्या केल्या, ज्यामुळे त्याची लूट ऐतिहासिक ठरली. त्यानं फक्त लूटीसाठी भारतावर स्वारी करून मंदिरातील मोठी संपत्ती घेतली आणि त्याच्या काळात गझनी शहराचा विकास केला," असं इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी सांगितलं.

मोहम्मद गझनीचा इतिहास : "मोहम्मद गझनी याचा जन्म 971 मध्ये झाला. इसवी सन 1000 ते 1030 या काळात त्यानं राज्य केलं. गझनी शहराचा तो सुलतान होता आणि सुलतान ही पदवी लावणारा पहिला मुस्लीम शासक मानला जातो. त्याचे वडील सबक्तदीन होते. मोहम्मद गझनी हा अत्यंत क्रूर होता. त्यानं आपल्या भावांना ठार मारलं आणि नातेवाईकांना संपवून इसवी सन १००० मध्ये सत्ता मिळवली. त्यानंतर त्यानं स्वतःला सुलतान घोषित केलं. त्यानंतर त्याची वक्रदृष्टी भारताकडं वळली आणि भारतात एकूण १७ स्वाऱ्या केल्या," असं म्हस्के यांनी सांगितलं.

ओहिंद प्रांतातील राजपूतांनी दिली टक्कर: मोहम्मद गझनीनं भारतावर लूट करण्यासाठी एकूण 17 स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांना थांबवण्यासाठी आजच्या पाकिस्तानमधील ओहिंद प्रांतातील राजपूत घराण्याचा जयपाल नावाचा शासक त्याच्या विरोधात उभा राहिला. त्या काळी जयपाल स्वतः गझनी प्रांतात पोहोचला आणि मोहम्मद गझनीचा पराभव न केल्यास तो आत्महत्या करेल, असं आपल्या सैन्याला सांगितलं. गझनीचा पराभव न करू शकल्यानं जयपालनं आपल्या 11 वर्षाचा मुलगा अनंतपाल याला राजा घोषित करून स्वतः आत्महत्या केली. अनंतपालनं अवघ्या 12 वर्षांच्या वयात सत्ता मिळाल्यानंतरही मोहम्मद गझनीला भारतावर आक्रमण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही अपयश आलं. त्यानंतर अनंतपालचा मुलगा त्रिलोचनपाल देखील गझनीला थांबवू शकला नाही.
17व्या स्वारीत मंदिर उद्ध्वस्त : "मोहम्मद गझनीनं सोरटी सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये 17 वी आणि शेवटची स्वारी केली. त्यावेळी गुजरातमध्ये राज्य करणाऱ्या भीम नावाच्या राजानं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तीन दिवस मोठा रक्तपात झाला. मोहम्मद गझनीनं अनेकांना ठार मारून सोरटी सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा लुटलं आणि प्रचंड प्रमाणात संपत्ती मिळवली. आतापर्यंतच्या १६ हल्ल्यांमध्ये मंदिरातील मूर्तीला हात लावला नव्हता, पण या 17व्या स्वारीत त्याच्या सैन्याचे वजीर म्हणाले की, 'मंदिरातील मूर्ती तोडून इस्लामचे खरे अनुयायी असल्याचं सिद्ध करा.' यावर मोहम्मद गझनीनं सोरटी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाचं नुकसान केलं. लूट मोठ्या प्रमाणात मिळाल्यानंतर माघारी परतताना त्याला रोखण्यासाठी राजपूत राजे एकत्र आले, पण मोहम्मद गझनीनं परतीचा मार्ग बदलला आणि ते परत गेले."

गझनी शहराचा कायापालट : "सोरटी सोमनाथ मंदिरातून मिळालेल्या लुटीच्या संपत्तीतून मोहम्मद गझनीनं गझनी शहराचा विकास केला. त्यानं तिथं विद्यापीठ आणि मोठं ग्रंथालय उभारलं. 1030 मध्ये आजारी पडलेल्या गझनीनं वैद्यांना बोलावून 'मला पुन्हा तरुण व्हायचं आहे, उपचार करा', असं सांगितलं, पण वैद्यांनी हे शक्य नसल्याचं उत्तर दिलं. शेवटी 1030 मध्येच गझनीनं अखेराचा श्वास घेतला," असं इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी सांगितलं.

दिल्ली शहराची स्थापना : मोहम्मद गझनीचा प्रतिकार करणाऱ्या अनंतपाल आणि जयपाल यांच्या मृत्यूनंतर राजघराण्याचे अनेक सदस्य दिल्लीकडं गेले. त्यानंतर राजपूत तोमर वंशानं भविष्यात आपली राजधानी म्हणून दिल्ली शहराचा विकास केला.
इंग्रजांनी गझनीतून आणलं चंदनाचं दार : 1842 मध्ये भारतावर इंग्रजांची सत्ता असताना लॉर्ड एलिनबरो यांना सोरटी सोमनाथ मंदिर मोहम्मद गझनीनं लुटलं असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी गझनीवर हल्ला केला आणि तिथली काही संपत्ती भारतात आणली. यावेळी इंग्रज लष्करी अधिकारी विल्यम क्नोट सोबत होता. त्यानं गझनी शहरातून चंदनाचं दार आणल्याचा दावा केला, जे सोरटी सोमनाथ मंदिराचं असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, इतिहासकारांनी हा दावा फेटाळून लावला आहे. आजच्या स्थितीत ते चंदनाचं दार आग्रा इथं ठेवण्यात आलं आहे.

गझनी शहराची सद्यस्थिती : सोरटी सोमनाथ मंदिर लुटून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गझनी शहरात नेली गेली होती. मोहम्मद गझनीच्या काळात शहराचा विकास झाला असला, तरी आज गझनी हे शहर उध्वस्त झालेलं आहे.

सरदार पटेल यांनी केला मंदिराचा जिर्णोद्धार: "भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1951 मध्ये सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या पुनर्निर्माणानंतर मंदिराला भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झालं. आज सोरटी सोमनाथ मंदिर भारतीयांसाठी अत्यंत आस्थेचं केंद्र बनलेलं आहे," असं इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी नमूद केलं.
हेही वाचा

