तृतीयपंथी विद्यार्थ्यांचं नाव आणि लिंग गुणपत्रिकेवर बदलून देण्यास एसएनडीटीचा नकार, विद्यार्थ्याची हायकोर्टात याचिका
महिला विद्यापीठ या नात्यानं पुरुष म्हणून जर एखाद्याला दाखला दिला तर आमचं मूळ अस्तित्वच नष्ट होईल, असा दावाही एसएनडीटीनं केलाय.


Published : February 26, 2026 at 10:17 AM IST
|Updated : February 26, 2026 at 10:51 AM IST
मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठानं एका तृतीयपंथीयांच्या बी कॉम आणि एम कॉमच्या रिझल्टवर महिला ऐवजी पुरुष, अशी नोंद करण्यास नकार दिलाय. या निर्णयाविरोधात या तृतीयपंथीय विद्यार्थ्यानं मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. या याचिकेवर आज गुरुवारी तातडीची सुनावणी होणार आहे.
काय आहे याचिका? - या तृतीयपंथीयाच्या जन्म दाखल्यावर मुलगी अशी नोंद होती. या विद्यार्थ्यांचं शिक्षण एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महाविद्यालयातून झालंय. एम कॉमची पदवी घेतल्यानंतर त्यानं शस्त्रक्रिया करून घेत पुरुष होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यानं त्याच्या प्रमाणपत्रांवरचं नाव आणि लिंगाचा तपशील बदलून त्यात महिला ऐवजी पुरुष, अशी नोंद प्रमाणपत्रांवर करून घेतली. तसेच सरकार दरबारी गॅझेटमध्येही हा बदल अधिकृतपणे करून घेतला. बी कॉम आणि एम कॉमच्या मार्कशीटवर नाव आणि लिंग बदलासाठी या तृतीयपंथीय विद्यार्थ्यानं एसएनडीटी महिला विद्यापीठाकडे अर्ज केलाय. मात्र हा बदल करता येणार नाही, असं विद्यापीठानं कळवलंय. तेव्हा आपल्या लिंगाची नोंद बदलून देण्याची मागणी करत या तृतीयपंथी विद्यार्थ्यानं वकील क्रांती यांच्यामार्फत ही हायकोर्टात याचिका दाखल केलीय. विद्यार्थ्याचं नाव आणि लिंग हे तपशील बदलण्यास विद्यापीठानं नकार देणं हा त्याच्या संविधानिक मूलभूत अधिकाराचा भंग आहे, असा आरोप विद्यार्थ्यानं या याचिकेतून केलाय.
एसएनसडीटीची भूमिका काय? - आपल्या पदवी निकालपत्रावरील नाव आणि लिंग हे तपशील बदलण्याचे आदेश हायकोर्टानं एसएनडीटी महिला विद्यापीठाला द्यावेत, अशी मागणी या तृतीयपंथीय विद्यार्थ्यानं याचिकेतून केलीय. मात्र यावर आपली भूमिका स्पष्ट करताना विद्यापीठानं स्पष्ट केलंय की, मुळातच आमचं महिला विद्यापीठ आहे. रिझल्टवर महिला ऐवजी पुरुष असा बदल करून दिल्यास विद्यापीठाचं मूळ अस्तित्वच संपुष्टात येईल. त्यामुळे असं कारण देत या तृतीयपंथीय विद्यार्थ्याचं नाव आणि लिंग याची नोंद बदलण्यास महिला विद्यापीठानं स्पष्टपणे नकार दिलाय. तेव्हा आता यावर हायकोर्टात काय तोडगा काढणार?, निकाल कुणाच्या बाजूनं लागणार?, यावर आजच्या सुनावणीत फैसला होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः
रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरण, शूटरसह परराज्यातून अटक आरोपींची पोलीस कोठडी वाढवली
यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या अपहार प्रकरणी शेखर चरेगावकर यांना अटक, चार दिवस पोलीस कोठडी

