साखरपुड्यासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; दुचाकी, एसटी, कारच्या तिहेरी अपघातात सहाजण ठार
जळगावमध्ये दुचाकी, एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Published : June 9, 2026 at 10:43 AM IST
जळगाव - दुचाकी, कार आणि एसटी बसच्या तिहेरी भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सातवाजेच्या सुमारास घडली. हा भीषण अपघात जळगावमधील अमळनेर- धुळे रस्त्यावर मंगरूळच्या पुढे हॉटेल वृंदावनजवळ घडला. गुजरातमधील महाजन कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा भयावह अपघात घडला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तीन वाहनांचा भीषण अपघात - दुचाकी, एसटी बस ही वाहनं अमळनेरकडून धुळ्याकडं जात होती. त्यावेळी समोरून धुळ्याकडून येणाऱया कारनं एसटी बस आणि दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. यात धरणगाव येथील दुचाकी चालक जागीच ठार झाला. तसंच कारमधील महिला आणि पुरुष असे एकूण सहाजण जागीच ठार झाले.
साखरपुड्याला जात असताना अपघात - गुजरात येथील आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन, सुरेश विक्रम महाजन हे साखरपुड्यासाठी अमळनेर येथे येत होते. त्यावेळी महाजन कुटुंबावर काळानं घाला घातला.
अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येताना मृत्यूमुखी पडलेले कारमधील सर्वजण गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी आहेत. आनंदाच्या क्षणांसाठी निघालेल्या या कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. प्राथमिक माहितीनुसार, मंगरूळ गावाजवळ भरधाव वेगातील कार, दुचाकी आणि एसटीची बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणावर घुमल्याने ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
स्थानिक रहिवासी, पोलिसांनी केलं मदतकार्य - अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक लहान मुलगा कारमध्ये अडकून पडला होता. स्थानिक गावकरी, पोलीस आणि एसटी कर्मचारी यांच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं. या अपघातात एसटीमधील दीपक दिलीप पाटील हा प्रवासी जखमी झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.

