विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चं वार्षिक प्रदर्शन रंगात
मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाइन येथे 89वं वार्षिक कला प्रदर्शन आणि कॉन्व्होकेशन 2025-26 उत्साहानं साजरा होत आहे.

Published : February 22, 2026 at 1:54 PM IST
मुंबई : मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाइन येथे 89वं वार्षिक कला प्रदर्शन आणि कॉन्व्होकेशन 2025-26 उत्साहानं साजरा होत आहे. या भव्य समारंभात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि कल्पनाशक्तीचा उत्सव साजरा होत असून, यंदा 'अंतरा' या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन रंगलं आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतील कला महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच, कला रसिक नागरिक मोठ्या उत्साहानं प्रदर्शनाला भेट देत आहेत. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून समकालीन कला आणि डिझाइनच्या प्रवाहांचं प्रभावी दर्शन घडवत आहे.
फोर्ट येथील कॅम्पसमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता झालं. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये : या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षभरातील सर्जनशील प्रवासाचं दर्शन घडत आहे. कला आणि डिझाइन क्षेत्रातील विविध प्रयोग, संशोधनाधारित प्रकल्प आणि नवकल्पना यांचं सादरीकरण इथं पाहायला मिळत आहे. यामध्ये जाहिरात मोहिम प्रकल्प, टायपोग्राफी व ब्रँडिंग डिझाइन, फोटोग्राफी आणि इलस्ट्रेशन, मीडिया व कॉम्प्युटर ग्राफिक डिझाइन, सामाजिक विषयांवरील संकल्पनात्मक प्रकल्प तसेच संशोधनाधारित डिझाइन प्रकल्पांचा समावेश आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सर्जनशील संवाद वाढवण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे कला व सौंदर्य विभागाच्या प्राध्यापिका स्नेहल तांबूलवाडीकर खेडकर यांनी सांगितलं.

'अंतरा' संकल्पना काय आहे? : 'अंतरा' ही यंदाची थीम कल्पनाशक्ती, आत्मपरीक्षण आणि सर्जनशील शोध यांवर आधारित आहे. मनाच्या अंतरंगातील विचारांना कलात्मक रूप देण्याचा हा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख आणि स्वतंत्र सर्जनशील आवाज शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही संकल्पना आहे, अशी माहिती कला व सौंदर्य विभागाच्या प्राध्यापिका स्नेहल तांबूलवाडीकर खेडकर यांनी दिली.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षभर केलेल्या कामाचं सादरीकरण करण्याची संधी मिळते. दरवर्षी नव्या थीममुळे त्यांच्या कलात्मकतेला नवे आयाम प्राप्त होतात. तसेच शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंट्री सादरीकरणासाठीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. महाविद्यालयाचे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होतात.
यंदा 1980 च्या दशकात बीएफए पूर्ण केलेल्या नागालँडमधील माजी विद्यार्थ्यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच गिरीश मोहिते हे माजी विद्यार्थी दिग्दर्शक त्यांची शॉर्ट फिल्म सादर करून दिग्दर्शन विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदर्शन कामकाज समितीतील सदस्य विद्यार्थीनी प्रांजली मुळीक आणि अमृता जाधव यांनी सांगितले की, प्रदर्शनाची तयारी साधारण दोन महिने आधी सुरू होते. थीम निश्चित करण्यापूर्वी सर्व विभागांतील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात सविस्तर चर्चा केली जाते. पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षापर्यंत सर्व विद्यार्थी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारून प्रवेशद्वार, स्टेज आणि प्रदर्शन मांडणीची कामे स्वतः पार पाडतात.

मान्यवरांची उपस्थिती : उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील श्रीकृष्ण महाडिक, प्रा. विनय कृष्णाजी सायनेकर आणि बी. वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी संधी, नागरिकांसाठी अनुभव : हे प्रदर्शन केवळ कलाकृतींचे दालन नसून कलाकार आणि नागरिक यांच्यात संवाद घडवणारे प्रभावी व्यासपीठ आहे. नव्या ट्रेंड्सची ओळख, व्यावसायिक संधी आणि सर्जनशील समुदायाशी संवाद साधण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. कला रसिक, डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी तरुण पिढीच्या कल्पनाशक्तीचा आणि नवोन्मेषी विचारांचा अनुभव घेण्याची ही विशेष संधी ठरणार आहे, असे स्नेहल तांबूलवाडीकर खेडकर यांनी सांगितले.

प्रदर्शनातील विशेष कार्यक्रम : आज आणि उद्या 'कला-दीप'तर्फे विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये लघुपट प्रदर्शन, निसर्गचित्रण उपक्रम, सर्जनशील प्रात्यक्षिके, नाट्य प्रयोग, शास्त्रीय संगीत मैफिली, विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स आणि फॅशन शो यांचा समावेश आहे.
हेही वाचा

