सांस्कृतिक पुण्यनगरीत गणेशोत्सवात डीजे वाजवायचा की नाही? पुणेकरांचं म्हणणं काय? पाहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असं काही मंडळांचं म्हणणंय, तर काहींचा नियमानुसार साऊंड लावण्याचा आग्रह आहे. त्याचाच आढावा घेतलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.

Published : August 28, 2026 at 1:48 PM IST
|Updated : August 28, 2026 at 3:26 PM IST
पुणे: पुणे शहराची ओळख सांस्कृतिक राजधानी असून, या सांस्कृतिक पुण्यनगरीतील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून नागरिक इथे येत असतात आणि पुण्यातील या सांस्कृतिक गणेशोत्सवाचे मागील काही वर्षांत स्वरूप वाढले असून, विसर्जनाच्या मिरवणुकीला 30-30 तास लागत आहेत. कर्णकर्कश्श डीजेने अनेकांना त्रास होऊ लागला असून, आता या डीजेबाबत पुण्यातील काही मंडळेही आक्रमक झालीत. ती आता डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असं म्हणत आहेत, तर काही मंडळांकडून नियमानुसार साऊंड लावण्यात यावा, असं सांगितलं जात आहे.
पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध : काही दिवसांनी सर्वत्र दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे, तर यानंतर येत्या 14 सप्टेंबरपासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून, सध्या डीजेच्या मुद्द्यावरून पुण्यातील गणेशोत्सव मंडळांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. नुकतंच पुणे महानगरपालिकेत झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला. काही गणेश मंडळांनी डीजेला विरोध करत पारंपरिक वाद्ये आणि संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डीजेवरील पूर्ण बंदीस तीव्र विरोध दर्शवला आहे.

148 ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल ऐकू आल्याने त्यांच्यावर कारवाई : याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सगळे सण-उत्सव साजरी करणे अनिवार्य आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिड या वस्तूंचे डेसिबल खूप जास्त आहेत हे निदर्शनास आलंय आणि पुणे पोलीस आयुक्तालयात याबाबत टेस्टिंगसुद्धा झाली आहे. गणेश मंडळांकडूनसुद्धा प्लाझ्मा, प्रेशर मिड, लेसर या गोष्टी वापरणार नसल्याची चर्चा झालेली आहे. किती बेस, किती टॉप याबद्दल विविध मागण्या आहेत, त्याबद्दल 4 बेस 4 टॉप विसर्जन मिरवणुकीत वापरले जातील, यापेक्षा जास्त कोणी वापरणार नाही, असं गणेश मंडळानी सांगितलं आहे. त्याबद्दल विचार विनिमय सुरू आहे. तसेच मोकळ्या जागेत जिथे स्थिर कार्यक्रम आहेत, तिथे 6 बेस 6 टॉप लावण्यासाठी काही मंडळांचा आग्रह आहे, त्याबद्दलसुद्धा चर्चा सुरू आहे. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. काल झालेल्या मिरवणुकीत 6 ठिकाणी प्लाझ्मा आणि प्रेशर मिड वापरण्यात आला, त्यामुळे सगळी साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली. 1000 पेक्षा जास्त चाचण्या आवाजाच्या काल घेतल्या गेल्या आणि 148 ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल ऐकू आला असल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आलीय. तसेच ढोल ताशाबद्दलसुद्धा अनेक तक्रारी येत आहेत, त्यांच्याकडून सुरू असलेला सरावबद्दल तक्रारी आहेत. विसर्जन मिरवणुकीत किती ढोल ताशा पथकं लावायचे, याबद्दल लवकर निर्णय होईल, असं यावेळी त्यांनी सांगितलंय.

गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तीव्र त्रास : याबाबत पुण्याचे खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करताना समाजप्रबोधन, व्याख्याने, वैचारिक देवाणघेवाण, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम यांवर भर दिला होता. आज तोच मूळ हेतू पुढे नेऊन सकस कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. डीजेमुळे लहान मुले, वृद्ध, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तीव्र त्रास सहन करावा लागतो. अशा गोंगाटामुळे नागरिकांना शहरातून स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये पुण्यातील ज्या सुमारे 200 गणेश मंडळांनी यंदा डीजे न वापरता विधायक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे स्वागत असून पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. गणेशोत्सवात पुण्याने घालून दिलेला आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारावा, असा ‘पुणे पॅटर्न’ निर्माण होण्याची गरज असून, न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन व्हायला पाहिजे, असंही यावेळी त्यांनी सांगितलंय.
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली : याबाबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि युवा उद्योजक पुनीत बालन म्हणाले की, 1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी आणि 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. या उत्सवाचा केंद्रबिंदू पुणे असून, तो सांस्कृतिक आणि पारंपरिक वाद्यांनीच साजरा झाला पाहिजे. साऊंड सिस्टीमच्या भिंतींसमोर भक्तिगीतांऐवजी अश्लील गाणी वाजवून केले जाणारे गैरप्रकार ही आपली संस्कृती आणि परंपरा नाही. त्यामुळे हा उत्सव पूर्णपणे डीजेमुक्त असायला हवा, तसेच सध्या 150 ते 200 हून अधिक गणेश मंडळे डीजेमुक्त उत्सवाच्या भूमिकेत सहभागी झाली आहे. पुढे जाऊन ही एक मोठी चळवळ बनेल आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने या भूमिकेसोबत जोडले जातील, असं यावेळी त्यांनी सांगितलंय.

ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांना प्रचंड त्रास : याबाबत सर्वसामान्य पुणेकर ज्यांनी महापालिकेच्या बैठकीत आपली बाजू मांडली, तेव्हा काही मंडळांनी त्यांना विरोध केला. ते विद्यानंद बापट म्हणाले की, उत्सवाच्या काळात पुण्यात, विशेषतः मध्यवर्ती पेठांच्या भागात ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करण्यास आमचा कोणताही विरोध नाही, मात्र हा उत्सव पूर्णपणे 'लाऊडस्पीकरमुक्त' स्वरूपात साजरा केला जावा. सोलापूरमध्ये यापूर्वीच अशी आदर्श पद्धत राबवण्यात आली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्याने पुण्यातही लाऊडस्पीकरमुक्त उत्सव साजरा व्हावा, हीच आमची मागणी आहे.
स्पीकर वाजलेच पाहिजेत मात्र नियमांचे पालन करणं आवश्यक : याबाबत माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुण्याचा गणेशोत्सव हा जागतिक स्तरावर नावाजलेला असून, त्याला एक मोठा पारंपरिक वारसा लाभला आहे. त्यामुळे गुटख्याच्या पैशातून स्वतःचे ब्रँडिंग करू पाहणाऱ्या आणि गणेश मंडळांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योजकांनी मंडळांनी काय करावे हे सांगू नये, कुठलाही सण हा वाजत-गाजत, गुलाल उधळत साजरा केल्याशिवाय पूर्ण होत नाही. उत्सवात अतिरेक होता कामा नये, या मताशी आम्हीही सहमत आहोत; पण याचा अर्थ असा नाही की स्पीकर किंवा उत्सवावर सरसकट बंदी आणावी. स्पीकर वाजलेच पाहिजेत, मात्र त्यात नियमांचे पालन आणि अतिरेक टाळणे गरजेचे आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलंय.

आमचा प्लाझ्माला पूर्णपणे विरोध : याबाबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे परेश खांडगे म्हणाला की, सध्या डिजेला पूर्णपणे विरोध केला जात आहे, त्याला आमच्या काही मंडळांचा विरोध असून, आमचा प्लाझ्माला पूर्णपणे विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की, पोलिसांकडून ज्या नियमावली दिल्या जाणार आहेत, त्या नियमांचं पालन होऊन साउंड लागले पाहिजे आणि यासाठी जवळपास 500 मंडळांचा आम्हाला पाठिंबा मिळाला आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलंय.
पुणे पोलिसांकडून नियमावली देण्यात येणार : याबाबत साऊंड विक्रेते सिद्धार्थ म्हणाले की, आमच्या पुणे साऊंड असोसिएशनची बैठक झाली असून, या बैठकीत आमचं ठरलं की पुणे पोलिसांकडून जी नियमावली देण्यात येणार आहे, त्याचं काटेकोरपणे पालन होणार आहे. आम्ही चांगलं साऊंड वाजवणार असून, आपापसात कुठेही कॉम्प्युटेशन करणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. याआधी देखील साऊंड लागत होते, तेव्हा जसे साऊंड लागायचे तसेच लावणार आहोत आणि याला आता मंडळांचादेखील सहभाग मिळाला आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलंय.
आम्हाला डीजे नको, पुणेकरांची प्रतिक्रिया : "माझ्या घरी परदेशी नागरिक हे खूप येत असतात. माझे जावई स्पॅनिश असून ते गेल्या वर्षी पुण्यात आल्यावर त्यांना मी गणेशोत्सव पाहायला बघायला घेऊन गेलो. त्यावेळी त्यांनी विसर्जन मिरवणुकीत जेव्हा डीजे बघितले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला नाही. आपल्याला पुण्याची जी संस्कृती आहे, ती त्यांना पाहायची होती. या डीजेमुळं मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि तो त्रास होऊ नये म्हणून आमचं एक पुणेकर म्हणून म्हणणं आहे की, आम्हाला डीजे नको आहे." असं एका पुणेकरानं सांगितलं. तर आणखी एका एका पुणेकरानं सांगितलं की, "जे डिजे लावले जात आहेत. त्यामुळं घरात जे रुग्ण आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि जर आपण आपल्या संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा केला तर तसा त्रास होत नाही. गणेश उत्सवात पारंपरिक वादन पाहिजे."

प्लाझ्मा साऊंडवर पूर्णपणे बंदी हवी : विजय हवालदार या तरुणानं सांगितलं की, "मी कोथरूड येथील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत मी ट्रॅक्टरवर उभा राहून नाचत होतो त्यावेळी प्लाझ्मा साऊंड खूप जोरात वाजत असल्यानं मला सुरुवातीला थोडा त्रास जाणवला. यानंतर विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर पाच-सहा दिवसांनी त्रास अधिक वाढत गेला आणि जेव्हा मी रुग्णालयात दाखवलं किंवा माझ्या कानाचा पडदा हा फाटला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि मला कानाची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यासाठी जवळपास मला अडीच लाख रुपये खर्च आले. माझं मत आहे की, प्लाझ्मा साऊंडवर पूर्णपणे बंदी असली पाहिजे."

डीजे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे - सुनील माने : कॅटलिस्ट फाऊंडेशनचे सुनील माने म्हणाले, "दीड वर्षांपूर्वी मी डीजेच्या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत डीजे हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे असं सांगितलं होतं. आता डीजेच्या संदर्भाची लोक चळवळ सुरू झाली आहे. ती चांगली गोष्ट असून नागरिक आता पुढं येत आहेत. प्रशासनानं थेट एका दिवसात आदेश काढत डीजेवर बंदी आणली पाहिजे. तसंच ढोल ताशा पथकानं देखील नियम हे घालून दिले पाहिजे. एकीकडे डीजे पूर्णपणे बंद व्हावं, असं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे ढोल ताशा पथकांना देखील आवाजाची मर्यादा घालावी. नाहीतर त्याचा त्रास देखील अधिक होईल. तर डीजे हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आता याचिकाकर्त्यांची संख्या देखील वाढत आहे."
हेही वाचाः
सागा इथं अडकलेले ३७ भाविक काठमांडूकडं रवाना : मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं मार्ग मोकळा
'तू कुठून तरी येशील . . . .' : रक्षाबंधनाला 'दादां'च्या आठवणीत खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

