नांदेड हादरलं; कुटुंबातील आई-वडील अन् दोन भावांचा मृत्यू, आत्महत्या की घातपात पोलिसांचा शोध सुरू
जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आई-वडील मृतावस्थेत आढळून आलेत, तर दोन मुलांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

Published : December 25, 2025 at 1:42 PM IST
|Updated : December 25, 2025 at 2:17 PM IST
नांदेड : जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार या गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, डी वाय एस पी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
- या घटनेत वडील रमेश सोनाजी लखे (वय 51) आणि आई राधाबाई रमेश लखे (वय 45) हे घरात मृतावस्थेत आढळून आले. तर त्यांचे दोन पुत्र उमेश लखे आणि बजरंग लखे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ही माहिती समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. मात्र याचदरम्यान, घरी जाऊन पाहणी केली असता आई-वडील देखील मृतावस्थेत आढळून आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
आत्महत्या की घातपात? संशय अधिक गडद : एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं आत्महत्या की घातपात, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. मुलांनी आत्महत्या केली असली तरी, आई-वडिलांचा मृत्यू नेमका कसा झाला. त्यांनीही आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला. याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घराचा आणि परिसराचा पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
पोलीस सर्व बाजूंनी तपासात गुंतले : या प्रकरणाचा तपास पोलीस अत्यंत गांभीर्यानं करत आहेत. कुटुंबीयांची पार्श्वभूमी, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद तसंच कोणताही बाह्य दबाव होता का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. तसंच शेजारी, नातेवाईकांच चौकशी सुरू आहे. या घटनेमुळं जवळा मुरहार गावात शोककळा पसरली आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.
प्रकरणाचा तपास सुरू : "रमेश सोनाजी लखे यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. 25 बाय 50 च्या जागेत राहत होते. त्यांचं तीस वर्षांपूर्वी छातीचं ऑपरेशन झालं होतं. काही दिवसापूर्वीच हृदयरोग तज्ज्ञाकडं त्यांनी तपासणी केली होती. शेती असल्यानं आर्थिक परिस्थिती ठीक नाही. तसंच राहत घर मातीचं आहे. चौघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. त्या आधारेच पुढची माहिती देण्यात येईल. सध्या तरी तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली
टीप - आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).
हेह वाचा :

